शहरात घरफोडीचे सत्र; लष्कर, भारती विद्यापीठ परिसरातील घटना

घरफोडी
घरफोडी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. बुधवारी शहरातील लष्कर, भारती विद्यापीठ, सिंहगड आणि येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार घरफोडीच्या घटना घडल्या असून, चोरट्यांनी 6 लाख 84 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. कॅम्प भागातील राजस्थान भवनाजवळील एका दुकानाच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा 60 हजारांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी भरत शंकर सुतार (वय 53, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 12 ते 13 मार्चदरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरत सुतार यांचे कॅम्पमधील कोळसागल्लीत दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला आणि रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा 60 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत. दुसर्‍या घटनेत कात्रजमधील संतोषनगरमधील एका घराचे भरदुपारी कुलूप तोडून सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा 2 लाख 24 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रमजानबी दाऊद शेख (वय 45, रा. संतोषनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 12 मार्च रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी 3 च्या दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी रमजानबी शेख यांचे घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्या, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असे 2 लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार भिंगारे करत आहेत. तिसरी घटना धायरीतील बेनकरवस्तीत भरदुपारी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 2 लाख 52 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी ललित दत्तात्रय सपकाळ (वय 35, रा. बेनकरवस्ती, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 12 मार्च रोजी दुपारी घडली आहे. फिर्यादी ललित सपकाळ हे घराला कुलूप लावून खासगी कामाला गेले होते. चोरट्यांनी याचा फायदा घेत कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील लोखंडी लॉकरमधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे 2 लाख 52 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. तपास पोलिस हवालदार गायकवाड करत आहेत.

वडगावशेरीत सोन्याचे दागिने व रोख लंपास

चौथ्या घटनेत वडगाव शेरी येथील एका घरातील लॉकर उचकटून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे 1 लाख 48 हजारांचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी महादेवी शंकर राठोड (वय 36, रा. भाजी मंडई, वडगाव शेरी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 12 मार्च रोजी घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महादेवी राठोड यांचे घर बंद असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून हॉलमधील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे 1 लाख 48 हजारांचे दागिने चोरून नेले . या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news