भोर : पुढारी वृत्तसेवा : रायरेश्वर किल्ल्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी नारायण जंगम यांच्या बैलाचा मृत्यू झाला. याआधी एक आठवड्यापूर्वी याच शेतकर्याचा अन्य एक बैलही बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता. यामुळे रायरेश्वर किल्ल्यावर बिबट्याची दहशत पसरली असून येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, आठवडाभराच्या अंतराने नारायण जंगम यांच्या दोन बैलांना बिबट्याने ठार केल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मागील 15 दिवसांपूर्वी रायरेश्वर किल्ल्याशेजारील रायरी गावात शेतकर्याची दुभती गाय बिबट्याने मारली होती. सद्यस्थितीला रायरेश्वर किल्ल्यावर व परिसरातील गावात बिबट्याचा वावर असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. छत्रपती शिवरायांच्या काळापासून रायरेश्वर किल्ल्यावर जंगम कुटुंबे राहतात. सध्या येथे 40 कुटुंबे असून उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पशुपालन, गव्हाची शेती केली जाते. मात्र, बिबट्या दरवर्षी जनावरांवर हल्ले करीत असून दिवसेंदिवस जनावरांच्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.