पिंपरी : बदलीच्या आदेशाला केराची टोपली

पिंपरी : बदलीच्या आदेशाला केराची टोपली

संतोष शिंदे :

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 360 पोलिस अंमलदारांच्या डिसेंबर 2022 मध्ये अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या आदेशानंतर प्रभारी अधिकार्‍यांना संबंधित पोलिस अंमलदार यांना कार्यमुक्त करण्याबाबत वेळोवेळी सूचित करण्यात आले. मात्र, सहा महिने उलटूनही काही अंमलदार अजूनही जागेवरच आहेत. त्यामुळे उच्चपदस्थांनी दिलेल्या बदल्यांच्या आदेशाला प्रभारी अधिकार्‍यांसह अंमलदार केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र आहे.

क्रीम पोस्टिंग सोडवेना…
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात काही ठाणी 'क्रीम पोस्टिंग' समजली जातात. येथे जाण्यासाठी अधिकार्‍यांसह अंमलदार धडपड करीत असतात. क्रीम पोस्टिंगवरून बदली झाल्यानंतर दुसर्‍या ठिकाणी हजर अनेक जण नाक, तोंड मुरडतात. काही अंमलदार तर बदलीनंतर कार्यमुक्त न करण्यासाठी प्रभारी अधिकार्‍यांनाच सेटिंग लावतात. प्रभारीदेखील संबंधित अंमलदारांकडून काही फायदा होत असल्यास त्याच्या बदलीच्या आदेशाकडे दुर्लक्ष करतात.

सेटिंगबहाद्दर तुपाशी
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात काही सेटिंगबहाद्दर पोलिस अंमलदार आहेत. जे दरवेळी आपल्या इच्छेप्रमाणे पोस्टिंग पदरात पाडून घेतात. याच्या उलट ज्यांच्यावर कोणाचाही वरदहस्त नाही असे अंमलदार नेहमीच साइड पोस्टिंगला वर्षोनुवर्षे खितपत पडत असल्याचे दिसून येते.

…म्हणून कर्मचारी सोडता येत नाहीत
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात मनुष्यबळाची कमतरता आहे. ज्यामुळे प्रभारी अधिकार्‍यांना पोलिस ठाण्यात अपेक्षित मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकत नाही. साप्ताहिक सुटी, आजारपण, महिला अंमलदाराच्या प्रसूती तसेच बालसंगोपन रजेमुळे हद्दीत प्रत्यक्ष काम करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडते. यामध्ये प्रभारी अधिकार्‍यांची मोठी दमछाक होते. त्यामुळे नवीन हजर झाल्याशिवाय जुने अंमलदार सोडता येत नसल्याचे अधिकारी खासगीत सांगतात.

पोलिस ठाण्यात मनुष्यबळ कमी असल्याच्या कारणामुळे बदली होऊनही काही प्रभारी अधिकार्‍यांनी अंमलदार सोडले नव्हते. मात्र, काही दिवसांपूर्वी वरिष्ठांनी पुन्हा आदेश केल्याने बहुतांश अंमलदार बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आले आहेत.
                          – भास्कर डेरे, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news