

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सोन्याचे दागिने आणि वस्तू यांच्यावर 1 एप्रिलपासून 6 अंकी हॉलमार्क नंबर आवश्यक असला तरीही अद्याप काही सराफ व्यावसायिकांकडील सर्व दागिन्यांवर हॉलमार्क नंबर पडलेला नाही. तसेच, त्यासाठी राबविण्यात येत असलेली ऑनलाइन प्रणालीदेखील संथगतीने सुरू आहे. त्यामुळे त्यासाठी वेळ लागू शकतो. 31 मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास सहा अंकी हॉलमार्क दागिने देणे सराफ व्यावसायिकांना शक्य होणार आहे.
देशात 1 एप्रिलपासून फक्त तेच सोन्याचे दागिने आणि वस्तू विकल्या जातील, ज्यावर 6 अंकी हॉलमार्क अल्फान्यूमेरिक युनिक आयडेंटिफिकेशन (एचयूआयडी) नंबर असेल. अर्थात सोन्यासाठी ही सहा अंकाची हॉलमार्क सिस्टीम सरकारने अनिवार्य केली आहे. त्यामुळे 31 मार्चनंतर सराफ व्यावसायिकांना एचयूआयडी हॉलमार्क नंबरशिवाय जुने हॉलमार्कचे दागिने विकण्याची परवानगी नसणार आहे. तथापि, ग्राहकांकडे असलेले जुने हॉलमार्क असलेले दागिने वैध राहतील. यामुळे नव्या नियमाचा जुन्या दागिन्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.
एचयूआयडी नंबर म्हणजे काय ?
आपल्याकडे अधिकृत ओळखीसाठी आधारकार्ड आहे. त्याचप्रमाणे दागिन्यांच्या ओळखीसाठी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (एचयूआयडी) नंबर असतो. हा सहा अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतो. ज्यात काही आकडे आणि अक्षरे असतात. प्रत्येक दागिन्यांवर ज्वेलर्सद्वारे हा नंबर दिला जातो. या नंबरच्या मदतीने तुम्ही दागिन्यांशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकता. सर्व ज्वेलर्सना ही माहिती बीआयएस पोर्टलवर अपलोड करावी लागते.
सराफ व्यावसायिकांकडील सोन्याच्या सर्व दागिन्यांवर सहा अंकी हॉलमार्क टाकण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. काही सराफ व्यावसायिकांचा हॉलमार्क नंबरसाठी माल पडून आहे. सरकारकडून ही प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण व्हायला हवी. अन्यथा, त्यासाठी मुदतवाढीची मागणी करावी लागेल.
– लखीचंद कटारिया, सराफ व्यावसायिक.हॉलमार्कसाठी असलेल्या ऑनलाइन प्रणाली सध्या संथ गतीने काम करत आहे. त्यामुळे काही प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांवर सहा अंकी हॉलमार्क नंबर पडणे बाकी आहे. 31 मार्चपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास 1 एप्रिलपासून सहा अंकी हॉलमार्क दागिने देणे शक्य होणार आहे.
– राहुल चोपडा, सराफ व्यावसायिक