कोरोनाची तिसरी लाट दीड महिन्यातच ओसरणार : डॉ. प्रदीप आवटे | पुढारी

कोरोनाची तिसरी लाट दीड महिन्यातच ओसरणार : डॉ. प्रदीप आवटे

पुणे; ज्ञानेश्‍वर भोंडे : कोरोनाची तिसरी लाट जानेवारी महिन्याच्या शेवटापासून कमी व्हायला लागेल. जानेवारीअखेर रुग्णसंख्या उतरणीला लागेल. म्हणजेच, या तिसर्‍या लाटेचा कालावधी दीड महिना असेल, अशी दिलासादायक माहिती साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली.

वाढती रुग्णसंख्या सध्या काळजीचा विषय ठरलेला आहे. ही तिसर्‍या लाटेची सुरुवात असून, सर्वसामान्यांसह शासकीय यंत्रणेने त्याचा धसका घेतला आहे. मुंबईपाठोपाठ राज्यात कोरोनाचा जोर वाढला आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यांतही रुग्णसंख्या वाढत आहे. शहरात ही रुग्णसंख्या दरदिवशी दुप्पट होताना दिसून येत आहे.

मुंबई, पुण्यासह राज्यात ओमायक्रॉनचा समूहसंसर्ग झाल्याचाही दुजोरा आरोग्य यंत्रणेने दिला आहे. म्हणून आता अधिकृतपणे तिसरी लाट सुरू झाली असल्याचे समजण्यात येत आहे. मात्र, पहिली आणि दुसरी लाट महिनोन् महिने चालली आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील बोजा वाढला. पण, दक्षिण आफ्रिकेत तिसरी लाट ही दीड महिन्यात आटोक्यात आली.

त्या धर्तीवर आपल्याकडील भौगोलिक रचना, लसीकरण, वयोगट आदी घटकांचा विचार करता ही लाट एकूण 4 ते 5 आठवडे चालेल, असे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. पण, गेल्या वर्षी 22 डिसेंबरपासून राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. आता ती पुणे जिल्ह्यात अडीच हजार आणि राज्यात 30 हजारांच्या दरम्यान पोहोचली आहे.

दक्षिण आफ्रिकेत चालली होती काही आठवडे

दक्षिण आफ्रिकेत तिसरी लाट काही आठवडे चालली. दोन आठवड्यांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. यामध्ये लक्षणेविरहित रुग्ण होते. सौम्य लक्षणे असल्याने हॉस्पिटलमध्ये भरती होणार्‍यांची संख्याही कमी होती. आपल्याकडे असलेले लसीकरण भौेगोलिक वातावरण, वयोगट, हर्ड इम्युनिटी यांचा विचार करता आपल्याकडे ही लाट जानेवारीच्या शेवटी ओसरणार असल्याचा अंदाज व्यक्‍त केला जात आहे.

आपल्याकडे रुग्णसंख्या वाढण्यास 22 डिसेंबरपासून सुरुवात झाली असून, जानेवारीअखेरीस रुग्णसंख्या उतरणीला लागेल. या लाटेचे एकूण आयुष्य हे 4 ते 5 महिन्यांचेच असेल, अशी शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेतही तिसरी लाट अशीच कमी कालावधीत संपली होती. दरम्यान, एकाच वेळी रुग्णसंख्येचा स्फोट होऊ नये म्हणून सर्वांनी कोव्हिड सुसंगत वर्तणूक करणे गरजेचे आहे.
– डॉ. प्रदीप आवटे, राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी

Back to top button