पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात पिकांना पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेचा विचार करून दुष्काळीस्थितीत शेतकर्यांनी मागेल त्याला शेततळे योजनेस चांगला प्रतिसाद दिला आहे. गतवर्ष 2023-24 मध्ये शेततळ्यांसाठी प्राप्त 106 कोटी रुपयांपैकी शेतकर्यांना अनुदानाचे सुमारे 97 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. तर एकूण 14 हजार 142 शेततळ्यांची उभारणी पूर्ण झालेली आहे. नव्याने उभारलेल्या शेततळ्यांमुळे 28 हजार 244 हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनचे संचालक आर. जे. भोसले यांनी दिली. पडणार्या पावसाचे पाणी साठवून ठेवून संरक्षित सिंचनाची सोय म्हणून शेततळी फायदेशीर आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेतून (मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना) मागेल त्याला शेततळे योजनेत वैयक्तिक शेततळ्यांची योजना राबविण्यात येते. अद्याप 1 हजार 170 शेततळ्यांसाठीचे 9 कोटींचे वाटपही हे संबंधित अर्जांच्या छाननीनंतर करण्यात येईल. योजनेची अंमलबजावणी महा-डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात गतवर्षात सर्वाधिक म्हणजे 3 हजार 208 शेततळी उभारून अहमदनगर जिल्ह्याने अग्रस्थान पटकावले असल्याची माहिती मृदसंधारणचे सह संचालक पांडुरंग शेळके यांनी दिली. ते म्हणाले, 2 हजार 211 शेततळ्यासह नाशिक दुसर्या स्थानावर आहे. त्या
खालोखाल सोलापूर 1566, सांगली 1331, पुणे 904, छत्रपती संभाजीनगर 744, सातारा 247, धाराशिव 205, कोल्हापूर 168, धुळे 153, लातूर 103, रायगड 98, अकोला 96, ठाणे 88, पालघर 84.
हेही वाचा