पुणे : विद्यार्थ्यांच्या आधार लिंकचे 95 टक्के काम पूर्ण ; शिक्षकांच्या पगाराचा प्रलंबित प्रश्नही सुटणार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सर्व विद्यार्थ्यांचे 'आधार' लिंक करण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आधार लिंकचे काम 95 टक्के झाले असून, काम न झाल्यामुळे शिक्षकांचे पगार रखडले होते. मात्र, आता तो प्रश्नदेखील लवकरच मार्गी लागणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आधार लिंक करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. शाळांकडून आधार लिंकचे काम पूर्ण न झाल्याने शिक्षकांचे पगार थांबविण्यात आले आहेत. शाळांकडून हे काम पूर्ण करणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात शिक्षकांचे पगार रखडवल्याने शिक्षक वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील शाळांचे आधार लिंकचे काम सध्या वेगाने सुरू असल्याने हा प्रश्न काही दिवसांमध्ये सुटणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील शिक्षकांनाच याचा फटका बसला आहे. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुटी आहे. अशामध्ये शासनाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार विद्यार्थीच आधार लिंक करण्यासाठी उपलब्ध होत नसल्याचे शाळांचे म्हणणे आहे. एप्रिलअखेरपर्यंत आधार लिंक करण्याचे शासनाचे निर्देश होते, परंतु ते पूर्ण न झाल्याने शासनाकडून शिक्षकांचेच पगार अडवण्यात आले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये सध्या हे काम वेगाने सुरू असून, शिल्लक राहिलेल्या पाच टक्के विद्यार्थ्यांचे येत्या काही दिवसांत आधार लिंक होईल, असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

संच मान्यता देताना आधार कार्डची संख्या ग्राह्य धरली जाणार आहे. आधार कार्ड जर शंभर टक्के असतील तर त्या शाळांची संच मान्यता होऊ शकते. म्हणून शंभर टक्के विद्यार्थ्यांचे आधार लिंक करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. हे काम पूर्ण होत आले आहे, सध्या 95 टक्के काम पूर्ण झाले आहे.
                            – संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news