पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मोफत पुस्तकांचे वाटप सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी अनुदानित आणि नगरपरिषदेच्या हद्दीतील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांना आत्तापर्यंत 95 टक्के पुस्तकांचे वाटप झाले आहे. पुढील दोन दिवसांत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार असल्याची शक्यता शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधून सुमारे 17 लाख 99 हजार 573 इतक्या पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यापैकी आत्तापर्यंत 16 लाख 97 हजार 603 इतक्या पुस्तकांची मागणी पूर्ण करून त्याचे वाटप करण्यात आले आहे.
त्यामुळे आत्तापर्यंत 94.33 टक्के पुस्तकांचे वाटप झाले आहे, असे शिक्षण विभागाने सांगितले. जिल्ह्यात हवेली, खेड, शिरूर आणि दौंड, बारामती तालुक्यांत सर्वाधिक पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे. येत्या 15 जून रोजी शाळा सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शाळांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बालभारतीकडून पुस्तकांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. तालुकास्तरावरून त्या-त्या तालुक्यातील शाळांमधून माध्यमनिहाय पुस्तकांची मागणी बालभारतीच्या 'ई-बालभारती' या वेबसाइटवर नोंदविण्यात आली होती. त्यानुसार पाठ्यपुस्तकांची छपाई करण्यात येते.
पहिली ते आठवीपर्यंतच्या विविध इंग्रजी, मराठी तसेच सेमी इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या पुस्तकांचे काही विषयांचे संच एकत्रित करण्यात आले आहेत. सातवीला बालभारती, इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र आणि सुलभ भारती हिंदी या विषयांचे एकत्रित संच तयार करण्यात आले आहेत. मराठी, उर्दू, हिंदी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकांची मागणी करण्यात आली. पुणे जिल्ह्यात तीन हजार 621 इतक्या शाळांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येत आहेत. त्यानुसार लहान मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी बालभारतीमार्फत एकत्रित पुस्तकांचा संच तयार करण्यात आला आहे. त्यामुळे विविध विषयांच्या पुस्तकांचे एकत्रित संच केल्याने हाताळण्यास उपयुक्त ठरत आहेत.
हेही वाचा