पुणे : रत्नपुरी आणि अंथूर्णे परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ; एकजण जखमी | पुढारी

पुणे : रत्नपुरी आणि अंथूर्णे परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ; एकजण जखमी

वालचंदनगर (जि. पुणे), पुढारी वृत्तसेवा

इंदापूरच्या पश्‍चिम भागातील रत्नपुरी व अंथूर्णे परिसरातील दोन घरांवर दरोडेखोरांनी दरोडा घालून रोख दीड लाख रुपये, साडे चौदा तोळे सोने व चांदीचा ऐवज लंपास केला आहे. या दरोड्यात चोरांनी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड यांना जबर मारहाण केली आहे. त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २७) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी रत्नपुरी जवळील गायकवाड वस्ती येथील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या बंगल्याचा दरवाजा कटावणीच्या सहाय्याने तोडून घरामध्ये प्रवेश केला. यावेळी गायकवाड यांच्या पत्नी सुनंदा जाग्या झाल्या. दरम्यान चोरांनी सुनंदा यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून कपाटातील सर्व ऐवज देण्यास सांगितले. सुनंदा यांनी घाबरून जाऊन कपाटातील रोख रक्कम दीड लाख, ११ तोळे सोन्याचे दागिने व चांदी असा ऐवज काढून दिला. त्याचवेळी राजेंद्र गायकवाड जागे झाले आणि त्यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरांनी राजेंद्र गायकवाड यांना काठीने मारहाण करत त्यांच्या कपाळावर धारदार शस्त्राने वार केला. यामध्ये राजेंद्र गायकवाड गंभीर जखमी झाले.

Mini Gypsy : “महिंद्रासाहेब, ही गाडी आमची लक्ष्मी; हवंतर तुम्हाला दुसरी गाडी बनवून देतो”

त्यानंतर चोरट्यांनी गायकावड पती-पत्नीला घरात कोंडून वरच्या मजल्यावर जाऊन चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र राजेंद्र व सुनंदा यांनी वर जाणारा दरवाजा रोखून धरला. यावेळी खाली सुरू असलेल्या झटापटीने घरातील वरच्या मजल्यावर झोपलेले राजेंद्र यांचे भाऊ राहुल व भावजय वैशाली जागे झाले. त्यावेळी राहुल यांनी वरून चोरट्यांना स्टीलची बादली फेकून मारली.

काही वेळात गायकवाड यांच्या घरात सुरू असलेला गोंधळ ऐकून आजूबाजूचे लोक जागे झाले. इतर नागरिक जागे झाल्याचे पाहून चोरट्यांनी ताब्यात असलेला ऐवज घेऊन पळ काढला. या घटनेत राजेंद्र यांच्या कपाळाला सहा टाके पडले आहेत.

दरम्यान, चोरट्यांनी गायकवाड वस्तीत दरोडा टाकून पळून जात असतानाच पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अंथूर्णे हद्दीतील वाघवस्ती येथील मल्हारी वाघ यांच्या घराचा दरवाजा तोडून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व सहा हजार रुपये रोख रकमेची चोरी केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. घटनेचा तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे करीत आहेत.

हेही वाचा :

व्हिडिओ पहा : मनस्वी प्रेम करणाऱ्या त्या दोघांना शाहू महाराजांनी एकत्र आणलं | shahu maharaj and one love story

Back to top button