आर्थिक प्रश्नांचा पाठपुरावा करू : ना. कराड यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांना ग्वाही | पुढारी

आर्थिक प्रश्नांचा पाठपुरावा करू : ना. कराड यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांना ग्वाही

पुणे ; वृत्तसंस्था : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना. भागवत कराड यांनी शनिवारी सकाळी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आणि दै. ‘पुुढारी’चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी महाराष्ट्र राज्यासमोरील आर्थिक प्रश्न त्यांच्यासमोर मांडले आणि त्या विषयी सविस्तर चर्चा केली. आपण मांडलेल्या प्रश्नांचा आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही ना. कराड यांनी यावेळी डॉ. जाधव यांना दिली.

‘जीएसटी’मधील महाराष्ट्राची 31 हजार 624 कोटी एवढी रक्कम केंद्र सरकारकडून यावयाची आहे, याकडे डॉ. जाधव यांनी ना. कराड यांचे लक्ष वेधले. आता या रकमेत आणखीही वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. सहकारी साखर उद्योगाचे निर्यात अनुदान प्रलंबित आहे. बफर स्टॉकसाठी गोदामांचे भाडे देण्याविषयीचे प्रस्ताव रेंगाळलेले आहेत.

इथेनॉल उत्पादनासाठी केंद्र सरकारने सवलतीने कर्ज पुरवण्याची योजना आखली आहे. साखर उद्योग, बँका आणि तेल कंपन्या असा त्रिपक्षीय करार त्यासाठी व्हायचा आहे. मात्र, त्याला तेल कंपन्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे डॉ. जाधव यांनी चर्चेवेळी निदर्शनास आणले, तेव्हा या प्रश्नात आपण जातीने लक्ष घालू, अशी ग्वाही ना. कराड यांनी दिली.

वेगवेगळ्या राष्ट्रीय योजना राज्य पातळीवर राबवल्या जातात. त्याचे अनुदान केंद्राकडून तातडीने मिळावे, असा मुद्दाही डॉ. जाधव यांनी मांडला. आयकर पोर्टल, जीएसटी पोर्टल यूझर फ्रेंडली करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. निर्यातीचा दाखला ऑनलाईन मिळण्यात विलंब होतो. वेळेत दाखला न मिळाल्यास निर्यातीचे अनुदान मिळत नाही.

त्याचा सर्वाधिक फटका शेती माल निर्यातीला बसतो. त्यामुळे निर्यातीचा दाखला विनाविलंब मिळावा, ही कृषी आणि उद्योग क्षेत्राची मागणीही त्यांनी मांडली. या सर्व प्रश्नांत लक्ष घालून त्यांची सोडवणूक करू, असे ना. कराड यांनी सांगितले. यावेळी डॉ. योगेश जाधव यांनीही चर्चेत भाग घेत सूचना केल्या.

डॉ. योगेश जाधव हे उर्वरित महाराष्ट्र वैैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यावेळी ना. भागवत कराड हे मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते. उभयतांचा पूर्वापार परिचय असल्याने यावेळी विविध विषयांवर चर्चाही झाली.

Back to top button