पुणे : अध्यापक विकास संस्था नवा दृष्टीकोन देणारी ठरेल : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : अध्यापक विकास संस्था नवा दृष्टीकोन देणारी ठरेल : उपमुख्यमंत्री अजित पवार
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : शिक्षण क्षेत्रात वेगाने घडत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अध्यापकांनी नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे असून अध्यापकांना त्यासाठी आवश्यक नवा दृष्टीकोन देण्यास महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले, आजचा विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडला गेला आहे. तो अभियांत्रिकी, वैद्यकीय, चित्रपट, नाटक, कला, संस्कृती, नवे शोध आदी क्षेत्राबाबत अधिक जागरूक आहे. शिक्षक आणि संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांच्या पुढे राहण्यासाठी नवा दृष्टीकोन स्विकारण्याची गरज आहे. अध्यापक विकास संस्थेच्या माध्यमातून नव्या युगातील आधुनिक ज्ञान आणि प्राध्यापकांच्या नेतृत्व गुणांचा विकास करणे शक्य होईल. चांगले शिक्षक घडविण्यासाठी ही संस्था उपयुक्त ठरेल.

देशाला गुरु-शिष्य परंपरेचा गौरवशाली वारसा लाभला आहे. हा वारसा समृद्ध करण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या ध्येयनिष्ठ गुरुजनांनी शिक्षणांची गंगा शेतकरी, कष्टकरी बहुजन समाजाच्या घरापर्यंत नेण्याचे काम केले, महिलांना शिक्षणाचे दरवाजे खुले केले. ध्येयनिष्ठ शिक्षणसेवेची परंपरा आजचे शिक्षकही पुढे नेत आहेत असे देखील पवार म्हणाले.

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना नवा वैज्ञानिक दृष्टीकोन देण्याचे कार्य केले. जयंत नारळीकर, जि.प.शाळेचे शिक्षक रणजित सिंह डिसले यांच्यासारख्या अनेक शिक्षकांचे कार्य मौलिक आहे. बदलत्या काळाची गरज लक्षात घेता अध्यापकांनी ही परंपरा पुढे नेण्यासाठी एका विषयापुरते मर्यादीत न रहाता ज्ञानकक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानासोबत नव्या संकल्पना मांडण्यासाठी आणि जगातील इतर भाषा, संस्कृती शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करावे, असे आवाहन पवार यांनी केले. पुणे येथे सारथी संस्था, सहकार भवन, कृषी भवन, कामगार भवन, नोंदणी भवन, शिक्षण आयुक्तालय आदी संस्था पुढील ५० वर्षांचा विचार करून उभारण्यात येत आहे. अध्यापक विकास संस्थेतही भविष्याचा विचार करून अधिक उन्नत सुविधा निर्माण कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बुद्धिवंतांना अधिक ज्ञानवान करणारी संस्था

अध्यापक विकास  संस्थेमुळे शिक्षणाचा दर्जा सुधारेल, शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र सुधारणा घडून येतील. जगातील नव्या ज्ञानाचा उपयोग प्राध्यापकांना झाल्यास त्याचा फायदा नव्या पिढीला होईल. संस्थेची इमारत प्रशिक्षणार्थींचा उत्साह वाढविणारी आहे. संस्थेत गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देताना त्यात सातत्य राखणे महत्वाचे आहे. संस्थेत असलेल्या सुविधा आणि दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामुळे ही संस्था अध्यापकांना अधिक ज्ञानवान करणारी ठरेल, असेही पवार म्हणाले.

प्रास्ताविकात संस्थेचे कार्यकारी संचालक निपुण विनायक यांनी संस्थेची माहिती दिली. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षकांचे प्रशिक्षण हे महत्वाचे अंग आहे. राज्यातील ४ हजारपेक्षा अधिक महाविद्यालये आणि दीड हजार तंत्र शिक्षण महाविद्यालयातील सुमारे १ लाख प्राध्यापकाना प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. राज्यातील सर्व विद्यापीठ संस्थेचे उपकेंद्र रहातील आणि त्याद्वारे प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्र सुदृढ होण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल – उदय सामंत

प्राध्यापकांना प्रशिक्षण देणारी देशातील ही पहिली संस्था आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याला आधुनिक शिक्षण मिळावे या उद्देशाने अध्यापक विकास संस्थेची स्थापना करण्यात आली. अनेक नामवंत संस्था या संस्थेसोबत काम करीत आहेत. इन्फोसिसने सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे मान्य केले आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच सामंजस्य करार आहे. प्राध्याकांसमवेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही आधुनिक स्वरुपाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा ६० कोटींचा प्रकल्प असून त्याचा हा पहिला टप्पा आहे. हा प्रकल्प देशपातळीवर आदर्शवत ठरेल असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

ऑक्स्फर्डला 'पुणे ऑफ वेस्ट' म्हणून ओळखले जाईल- आदित्य ठाकरे

शिक्षक हे आजच्या काळातील तंत्रज्ञान आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाप्रमाणे त्यांनाही अद्ययावत करणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने प्रशिक्षण महत्वाचे आहे. पुढची पिढी घडविण्याचे कार्य शिक्षक करतात. नवा देश, नवी पिढी घडविण्यासाठी शिक्षक आणि शिक्षण महत्वाचे आहे.  महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या माध्यमातून असे कार्य होईल आणि त्यातून देशाला नवी दिशा दिली जाईल. देशासह जगभरातील प्राध्यापक या संस्थेला भेट देण्यासाठी पुण्यात येतील. आज शिक्षण पद्धतीत केले जाणार बदल आणि निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा लक्षात घेता येत्या काळात ऑक्स्फर्डला 'पुणे ऑफ वेस्ट' म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. नव्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा वाढविण्यावर भर देण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

व्हिडिओ पहा : दिल ये जिद्दी है म्हणत ऐश्वर्याची विजयी घोडदौड

https://youtu.be/IYYU1mogoqk

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news