

भामा आसखेड ; पुढारी वृत्तसेवा
खेड तालुक्यातील कोये गावच्या बिसांबा ठाकरवाडी येथे बिबट्याने विकास बळवंत पारधी (वय ३२) यांच्यावर आज (शनिवार) सकाळी ९ वाजता हल्ला केला. यामध्ये पारधी यांच्या मानेला व डोक्याला मोठी जखम झाली आहे.
कोये गावच्या उत्तरेला विसांबा ठाकरवाडी आहे. पारधी हे शनिवारी सकाळी ९ वाजता शेळ्या चारण्यासाठी आपल्या लहान मुली समवेत गेले होते. येथील जि.प.च्या शाळेपासून जात असताना शाळेच्या मागे दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्रथम मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीला वाचविण्यासाठी पारधी गेले असता, बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या मानेला व डोक्याला मोठी जखम झाली. त्यांनी आरडा ओरड केल्याने बिबट्या पळून गेला.
त्यानंतर ठाकरवाडीतील नागरिक आल्यावर पारधी यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला पाठविण्यात आल्याची माहिती माजी सरपंच बाजीराव पारधी यांनी सांगितली आहे.
हल्ल्याची माहिती समजताच पाईट पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर चाकण वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी येऊन पाहणी केली. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.