पुणे ; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम भागांत वाजवणे परिसरात सद्या पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीने जनावरे गारठून प्राण सोडत आहेत. तीन अठवड्या पुर्वी याच परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले असताना आता हे थंडीचे नवीन संकट आले आहे.
वाजवणे परिसरात पडत असलेल्या थंडीने अक्षरशः घराबाहेर पडणे नकोसे झाले आहे. परिसरात सकाळच्या प्रहरी व संध्याकाळी रस्ते अक्षरशः ओस पडले आहेत. सर्वसामान्यांसह थंडीने जनावरांनाही बेजार केले आहे. थंडीचा गारठा सहन करू शकत नसल्यामुळे वाजवणे येथील दतु देवराम बच्चे या शेतकऱ्यांची म्हैशीची दोन पारडे दगावली आहेत. या घटनेमुळे इतर शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
एकीकडे अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केलेले असताना थंडीबरोबरच पाळीव कोंबड्या सह पशुधनावर अज्ञात रोगाचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून कोंबड्याही मृत पावत आहे. यामुळे प्रशासनाने तात्काळ पहाणी करून पंचनामे करण्याची मागणी करण्यात येत आहे.