

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा :लोकसभा निवडणूक लढायची असेल तर आधी गेल्या 9 वर्षांत मावळ तालुक्यात
केंद्राचा किती निधी आणला, कोणते महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणले व केंद्राशी निगडित असलेल्या तालुक्यातील प्रश्नांबाबत काय काय प्रयत्न केलेत, याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडा, असे खुले आव्हान आमदार सुनील शेळके यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले.
आमदार शेळके यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना खासदार बारणे यांच्या कार्यपद्धतीवरच एकप्रकारे टीका केली. ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या लाटेत निवडून येणे आता सोपे राहिलेले नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक लढून विजय मिळवायचा असेल तर कर्तृत्व सिद्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी खासदार बारणे यांनाही निवडणूक लढायची असेल, तर आधी त्यांनी गेल्या 9 वर्षांत सलग सत्तेत असताना लोकसभा मतदासंघांतील किमान मावळ तालुक्यातील काय काय कामे केली याचा लेखाजोखा मांडावा, असे थेट आव्हान दिले.
तालुक्यातील विकासकामांसाठी केंद्राचा किती निधी आणला, तालुक्यात कोणते महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणले, केंद्राशी निगडित असलेले मिसाईल प्रकल्प, रेल्वे अशा वर्षांनुवर्षे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी काय प्रयत्न केले हे जाहीर सांगावे, असे आवाहन केले. दरम्यान, गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात मंजूर झालेली विकासकामे व आश्वासन दिलेले शब्द आगामी सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तालुक्यातील विकासकामांसाठी आणखी 100 कोटींचा निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार शेळके यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघ भाजपला सुटणार असल्याच्या चर्चेबाबत बोलताना आमदार शेळके यांनी थेट भाजपचा काय संबंध, असा उल्लेख करत मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवड, मावळ तालुका व घाटाखालील भागात राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीलाच सुटावी, यासाठी आठवडाभरात राष्ट्रवादीच्या नेत्यांसह महायुतीच्या नेत्यांना भेटून मतदासंघांतील वास्तव स्थिती लेखी स्वरूपात मांडणार असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.
हेही वाचा