

नारायणगाव ; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा सहकारी बॅंक निवडणूकीमध्ये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजयराव काळे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे यांनी बुधवारी (ता. २२) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे सोसायटीच्या 'अ' गटातून महाविकास आघाडीचे उमेदवार काळे यांची बिनविरोध निवड झाली.
ॲड. काळे उपख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. काळे यांची वडील माजी आमदार स्व. शिवाजीराव काळे सलग ५५ वर्ष जिल्हा बँकेचे संचालक होते. या माध्यमातून काळे घराण्याची जिल्हा बँकेच्या संचालकपदी सलग ७५ वर्षे वर्णी लागली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेवरुन सभापती काळे व माजी सभापती लेंडे यांच्यात मागील पाच वर्ष राजकीय वाद निर्माण झाला होता. बँकेच्या मागील निवडणुकीत लेंडे यांचा सभापती काळे यांनी पराभव केला होता.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी लेंडे यांनी अर्ज दाखल केल्याने पुन्हा दुसऱ्यांदा काळे विरुध्द लेंडे यांच्यात राजकीय सामना रंगणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू होती. या लढतीकडे तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांचे लक्ष लागले होते. मात्र शेवटच्या क्षणी माघार घेतल्यामुळे त्यांच्यातील दुरावा कमी झाल्याचे चित्र आहे. बाजार समितीच्या येणाऱ्या निवडणुकीवर या मनोमिलनाचे परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.
"हा विजय माझ्या मतदारांचा आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार अतुल बेनके, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या सहकार्याने हा विजय मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आणि नेत्यांमुळे ही निवड बिनविरोध झाली आहे. बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम यापुढेही जोमाने सुरू ठेवणार आहे.
– ॲड. संजयराव शिवाजीराव काळे,
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, जुन्नर.