पुणे : पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडून खंडणी उकळणाऱ्या तरुणीसह तिघांना पकडले | पुढारी

पुणे : पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडून खंडणी उकळणाऱ्या तरुणीसह तिघांना पकडले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गुन्हा दाखल करण्याची धमकी देत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडून दोन लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तरुणीसह तिघांना गुन्हे शाखा युनिट दोनने रंगेहाथ पकडले. नेहा आयुब पठाण (वय २५, रा. कात्रज कोंढवा रस्ता), मेहबुब आयुब पठाण (वय ५२) आणि आयुब बशीर पठाण (वय ५५, दोघेही रा. अकलुज, ता. माळशिरस) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जिल्हा पशुसंवर्धन अधिकीर डॉ. शिवाजी विधाटे (वय ५६, रा. पिंपळे निलख) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लष्कर परिसरातील एसजीएस मॉलजवळील कॉफी हाऊसमध्ये शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी ही जिल्हा परिषेदेच्या पशुसंवर्धन विभागात ऑपरेटर म्हणून नेमणुकीला आहे. या तरुणीने तिचा हात पकडला, अश्लिल बोलले अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. याबाबत तरुणीला सर्वांसमोर विधाटे यांनी विचारणा केल्यानंतर खोटी तक्रार दिल्याचे मान्य केले होते. त्यानंतर या तरुणीने पुन्हा तक्रार असल्याचे सांगितले. त्यामुळे विधाटे यांनी या प्रकरणाची विशाखा समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.

दरम्यान, फिर्यादी विधाटे यांना गुरूवारी सायंकाळी एका व्यक्तीचा फोन आला. त्याने नेहा पठाण ही तुमच्या विरोधात पोलिस ठाण्यास तक्रार करणार आहे. नाहीतर प्रकरण मिटविण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी नक्की किती पैसे हवे आहेत, अशी विचारणा केल्यानंतर तीन लाखात प्रकरण मिटवून टाकू, असे त्या व्यक्तीने सांगितले. शेवटी तडजोडीत दोन लाख रूपये देण्याचे ठरले. तसेच, आता पैसे नसल्यामुळे उद्या सकाळी पैसे देतो, असे फिर्यादी यांनी सांगितले.

हा सर्व प्रकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर झाला. त्यानंतर फिर्यादी यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घतला. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे यांच्या खंडणी घेताना आरोपींना रंगेहाथ पकडण्याची योजना आखली. त्यानुसार कागदी नोटांचे बंडल तयार करून विधाटे यांच्याकडे दिले. खंडणीचे पैसे देण्यासाठी आरोपींनी त्यांना लष्कर परिसरातील एसजीएस मॉल येथील एका कॉफी शॉपमध्ये बोलविले. त्यावेळी नेहासोबत तीन व्यक्ती त्या ठिकाणी बसल्या होत्या. फिर्यादी यांनी पोलिसांनी दिलेले पैसे त्यांना दिले. पैसे घेतल्यानंतर तिघांना पकडण्यात आले. त्यावेळी तरुणीसोबत असलेले दोघेजण तिचे आई-वडील असल्याचे समोर आले आहे. तर, फोन करणारी व्यक्ती ही तिचा भाऊ होता. दरम्यान पोलिसानी तिघांना खंडणी घेताना रंगेहाथ पकडले आहे.

Back to top button