पुरेशी ओल पाहा, मगच पेरते व्हा! पावसाने ओढ दिल्याने कृषी विभागाचा बळीराजाला सल्ला

पुरेशी ओल पाहा, मगच पेरते व्हा! पावसाने ओढ दिल्याने कृषी विभागाचा बळीराजाला सल्ला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावल्यानंतर सद्य:स्थितीत खरिपातील पिकांच्या आठ लाख आठ हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, पावसाने सध्या ओढ दिलेली असल्यामुळे शेतकर्‍यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यासच खरीप पिकांची पेरणी करावी, असा सल्ला कृषी आयुक्तालयाने दिला आहे.

हंगामाच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकर्‍यांनी पेरण्यांनी सुरुवात केलेली आहे. खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र 142 लाख हेक्टरइतके आहे. गतवर्षी याच दिवशी सुमारे एक लाख 74 हजार 556 हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे गतवर्षापेक्षा चौपट क्षेत्रावर सध्या खरीपातील पिकांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.

या स्थितीत मान्सूनच्या पावसाची अपेक्षित हजेरी नसून पावसाने ओढ दिल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. तसेच, पावसाचा असमतोलही दिसून येत आहे. पेरणीसाठी अनुकूल वातावरण असणे आवश्यक आहे. तसेच जमिनीतील पुरेशा ओलाव्याशिवाय खरीप पिकांच्या पेरण्या केल्यास आणि नंतर पावसाची ओढ कायम राहिल्यास पिकांना फटका बसून शकतो. तूर्तास पहिल्या पेरणीतील पिकांसाठी जमिनीत आवश्यक ओलावा आहे. मात्र, पावसाचा खंड कसा राहतो, त्यावर चित्र अवलंबून राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कापूस, भात रोपवाटिका, सोयाबीनचा पेरा अधिक

खरीपातील पिकांच्या पेरण्यांमध्ये भाताच्या 27 हजार 983 हेक्टरवर रोपवाटिका टाकण्यात आल्या आहेत. तर कापसाची सर्वाधिक चार लाख 78 हजार 959 हेक्टर आणि सोयाबीनची एक लाख 76 हजार 260 हेक्टरवर पेरणी झाली आहे. खरीप पिकांची पीकनिहाय पेरण्यांची स्थिती हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे. खरीप ज्वारी 1452, बाजरी 10068, रागी 1252, मका 57827, इतर तृणधान्ये 446, तूर 30689, मूग 11789, उडीद 7711, इतर कडधान्ये 271, भुईमूग 3452 हेक्टरवर पेरणी पूर्ण झालेली आहे.

जून महिन्याच्या सरासरीच्या 57 टक्के पाऊस झाल्यामुळे खरीपातील पिकांच्या पेरण्या गतवर्षाच्या तुलनेत चांगल्या झाल्या आहेत, ही समाधानाची बाब आहे. सध्या पावसाने ओढ दिलेली असून 21 जूनपर्यंत पाऊस तुरळक असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
त्यामुळे जमिनीतील पुरेशा ओलाव्याशिवाय नव्याने खरीप पिकांच्या पेरण्या शेतकर्‍यांनी करू नये. पावसाला सुरुवात झाल्यानंतरच बीज प्रक्रिया करून पेरण्यांना प्राधान्य द्यावे.

– विनयकुमार आवटे, संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषी आयुक्तालय, पुणे

बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत नसल्याने राज्यात मान्सूनचा वेग मंदावला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता मान्सून सक्रिय होण्यासाठी आणखी किमान आठ दिवस वाट पाहावी लागू शकते. त्यामुळे शेतकर्‍यांनी पुरेसा पाऊस होण्याआधी खरीप पिकांच्या पेरण्यांची घाई करू नये.

– डॉ. मेधा खोले, संचालिका, पुणे वेधशाळा

शेतकर्‍यांनी निराश न होता पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करावी. हवेचा दाब कमी -जास्त होत असल्याने कुठे कमी तर कुठे फार कमी असा पाऊस होत आहे. 23 जूनपर्यंत असे चित्र राहील. यंदा पाऊस चांगला आहे. मात्र, तो कमी वेळात जास्त या ट्रेंडने पडण्याची शक्यता जास्त आहे.

– डॉ. रामचंद्र साबळे, कृषी हवामान तज्ज्ञ, पुणे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news