मोशी : नागेश्वर महाराजांच्या मानाच्या विड्यास 81 लाख

मोशी : नागेश्वर महाराजांच्या मानाच्या विड्यास 81 लाख

मोशी(ता. हवेली); पुढारी वृत्तसेवा : पन्नास लाखांपासून सुरू झालेली बोली पन्नास लाख, साठ लाख, ऐंशी लाख म्हणत म्हणत अखेर एक्याऐंशी लाखांवर येऊन थांबली, आणि तिसरा अंतिम पुकार झाला मानाचा विडा एक्याऐंशी लाखाला. मंदिरात टाळ्यांचा गजर झाला आणि मानाच्या विड्याची बोली लावलेले भाविक अतिश आनंदा बारणे नागेश्वराचरणी नतमस्तक झाले.

निमित्त होते मोशी (ता. हवेली, जि. पुणे) येथील नागेश्वर महाराज यात्रा व भंडारा उत्सवाचे. मोशीचे जागृत देवस्थान नागेश्वर महाराजांपाशी भक्तांची अतूट श्रद्धा व्यक्त करणारी यात्रेतील लिलाव प्रथा यंदाही पार पडली. महाराजांच्या उत्सवास शिवरात्रीपासून सुरुवात झाली असून, सोमवारी (दि.20 ) रोजी परंपरागत लिलाव नागेश्वर महाराज मंदिर सभागृहात पार पडला. उत्सवात वापरल्या गेलेल्या व महाराजांच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव जवळजवळ एक कोटींच्या वर गेला आहे.

मानाची ओटी भालचंद्र दत्तोबा बोराटे यांनी बोली लावून तब्बल 33 लाख 55 हजार 555 रुपयाला मिळवली. तर, लिलावात शेवटचे लिंबू फळ बोली लावून तब्बल 17 लाख रुपयाला नीरज नंदकुमार जाधव यांनी घेतले. या लिलावात बोली लावण्याचा मान केदारी कुटुंबाला देण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने नारायण केदारी, सागर केदारी, निखिल केदारी यांनी लिलावाचे काम पाहिले.

नागेश्वर महाराजांबाबत मोशीकरांची मोठी श्रद्धा असून वस्तूंच्या लाखोच्या बोलीतून श्रद्धा व्यक्त होताना दिसून येते. कोरोनामुळे दोन – तीन वर्षे यात्रा मर्यादित स्वरूपात साजरी करण्यात आली होती. यंदा मात्र जल्लोषात उत्सव साजरा करण्यात आला. परंपरेनुसार सर्व धार्मिक विधी पार पाडण्यात आले. परंपरेनुसार लिलाव उत्सव नागेश्वर महाराज सभामंडपामध्ये सोमवार (दि. 20) सकाळी दहा वाजल्यापासून लिलाव सुरू झाला. देवाच्या दारात पैशाला मोल नाही, हेच खरं याचा प्रत्यय करून देणारा हा लिलाव आहे.

हे त्या लिलावात सुरुवातीपासून शेवटपर्यंत बसणार्‍या हमखास जाणवते. उत्सवातील वस्तूंचा लिलाव पाहण्यासाठी सभा मंडपामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दरवर्षी या लिलावामध्ये भाविकांना अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा व भंडार्‍यातील प्रसाद व वस्तूंची बोली लावून लिलाव केला जातो. ग्रामस्थांकडून भंडार्‍यातील महाप्रसाद बनविण्याची भांडी दरवर्षी नव्याने खरेदी केली जातात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news