पुणे; पुढारी वृत्तसेवा : यकृतामध्ये जास्त प्रमाणात चरबी साठल्यामुळे 'फॅटी लिव्हर'ची समस्या निर्माण होते. वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास भविष्यात यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते, असे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. पाश्चात्त्य जीवनशैलीचे अनुकरण करताना आपण पारंपरिक चौरस आहार आणि व्यायामाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पुढील दहा वर्षांमध्ये 'फॅटी लिव्हर'चे प्रमाण अनेक पटींनी वाढू शकते.
जंक फूडचे सेवन, मद्यपान आणि धूम्रपानासारख्या सवयी, बदललेली जीवनशैली यामुळे 'फॅटी लिव्हर'चा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. यकृताभोवती अतिरिक्त चरबी जमण्याच्या प्रक्रियेची लक्षणे सुरुवातीला दिसून येत नाहीत. त्यामुळे निरामय आरोग्यासाठी यकृताची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत यकृत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासानुसार, पुढील पाच वर्षांमध्ये एक तृतीयांश भारतीयांमध्ये 'फॅटी लिव्हर'ची स्थिती निर्माण होऊ शकते. धकाधकीच्या जगात जीवनशैलीत सुधारणा करणे आवश्यक आहे. 20 ते 40 वयोगटातील व्यक्तींनी किमान दोन वर्षांतून एकदा आणि चाळिशीनंतर दरवर्षी तपासणी करावी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
फॅटी लिव्हर हे अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक या दोन प्रकारचे असतात. एएफएलडी हा आजार अतिरिक्त मद्यपान केल्यामुळे होतो. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज स्थूलता, उच्च रक्तदाब, मधुमेह यामुळे होतो.