कोथरूडकरांनी दिली शेवटपर्यंत साथ; मोहोळांच्या विजयात सिंहाचा वाटा

कोथरूडकरांनी दिली शेवटपर्यंत साथ; मोहोळांच्या विजयात सिंहाचा वाटा

[author title="हिरा सरवदे" image="http://"][/author]

पुणे : अटीतटीच्या लढतीमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे गणित कोथरूड विधानसभा मतदारसंघात किती लीड मिळतो, यावर अवलंबून होते. कोथरूडकरांनी मोहोळ यांची साथ पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत सोडली नाही. कोथरूड विधानसभा मतदार संघ हा भाजपचा बाल्लेकिल्ला असल्याचे मागील काही निवडणुकांवरून स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्यानंतर या मतदार संघाचे नेतृत्व राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी केले. तर सध्या भाजप नेते राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील कोथरूडचे प्रतिनिधित्व करतात. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये कोथरूडमधून भाजप उमेदवार गिरीश बापट यांना काँग्रेस उमेदवार मोहन जोशी यांच्यापेक्षा तब्बल 1 लाख 6 हजार 196 मतांची आघाडी मिळाली होती.

दुसरीकडे गतनिवडणूकीत भाजप सोबत असलेली ठाकरेंची शिवसेना काँग्रेससोबत असल्याने गत लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेले मताधिक्य भाजप या निवडणुकीत टिकवणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. अशीच परिस्थिती शहरातील इतर मतदार संघातलही असल्याने कोणत्या मतदार संघात कोण बाजी मारणार, याबाबत कोणीही अंदाज लावू शकत नव्हते. त्यामुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघ मोहोळ यांना किती मताधिक्य देतो, यावर विजयाची गणिते आखली जात होती. अखेर कोथरूडकरांनी मुरलीधर मोहोळ यांना इतर मतदारसंघाच्या तुलनेत चांगले मताधिक्य दिले आहे.

मोहोळ यांना मिळालेल्या 1 लाख 23 हजार 38 मताधिक्यामध्ये कोथरूडकरांचा वाटा 71 हजारांचा आहे. हे मताधिक्य गतनिवडणुकीच्या तुलनेत घटले असले तरी मोहोळ यांच्या विजयामध्ये कोथरूडचा वाटा मोठा आहे. जवळपास प्रत्येक फेरीमध्ये तीन ते पाच हजारापर्यंतचे मताधिक्य कोथरूडकरांनी मोहोळ यांच्या पारड्यात टाकले. कोथरूड मतदार संघातील तीन माजी नगरसेवक वगळता सर्व माजी नगरसेवक महायुतीचे आहेत. मोहोळ यांच्या विजयात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), मनसे, शिवसेना (शिंदे गट), रिपाइं कार्यकर्त्यांसह मुळशीकरांचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हणता येईल. निवडणुकीआधी काही दिवस अगोदर प्रा. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर संधी दिल्याने ब्राह्मण समाजाची नाराजी दूर झाल्याचे निकालावरून स्पष्ट होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले धाडसी निर्णय, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून पुणे शहरात झालेल्या विविध विकासकामांमुळे मतदारांनी महायुती व भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना एकजुटीने निवडून दिले आहे.

-माधुरी मिसाळ, आमदार, पर्वती विधानसभा मतदारसंघ

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news