नव्या टॅक्स व्यवस्थेत पीपीएफच्या व्याजाचे काय?

नव्या टॅक्स व्यवस्थेत पीपीएफच्या व्याजाचे काय?

[author title="प्रसाद पाटील" image="http://"][/author]

नियमित वेतन आणि निवृत्ती वेतन मिळणार्‍या नोकरदारांना मिळणार्‍या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ दोन्ही कर प्रणालीत कायम ठेवण्यात आला आहे. सध्या हे स्टँडर्ड डिडक्शन 50 हजार रुपये आहे. शिवाय अलीकडेच नवीन टॅक्स स्लॅब निवडण्याचा निर्णय घेतला असेल, तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही. या व्यवस्थेतही पब्लिक प्रॉव्हिडंड फंडच्या खात्यात जमा होणारे व्याज हे संपूर्णपणे करमुक्त राहील. नव्या कर प्रणालीत कपातीत बदल केला असून सवलतीत बदल नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

जुन्या कर रचनेनुसार (ओल्ड टॅक्स रेजिमी) करदात्यांना कलम 80 सीनुसार वेगवेगळी गुंतवणूक आणि खर्चाच्या कपातीचा लाभ मिळतो. यात 'पीपीएफ'मधील गुंतवणूक आणि त्यावर मिळणार्‍या व्याजाचा समावेश असतो. अर्थात, नवीन कर प्रणालीत 80 सीनुसार मिळणार्‍या कपातीचा पर्याय काढून टाकण्यात आला आहे. यामुळे पीपीएफच्या खात्यावर जमा होणार्‍या व्याजावर कर आकारणी होणार का, याबाबत अनेकांना चिंतेने ग्रासले होते.

नव्या कर रचनेत सवलत

तज्ज्ञांच्या मते, नवीन टॅक्स स्लॅबमध्ये सवलत आणि कपात यातील फरक जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 'पीपीएफ'वर मिळणारे व्याज हे सवलतीच्या श्रेणीत येते. त्याचवेळी 80 सी नुसार मिळणारा नफा हा कपातीच्या कक्षेत येतो. नव्या कर प्रणालीत 80 सीनुसार कपातीचा पर्याय काढून टाकला आहे; मात्र सध्याची सवलत कायम ठेवली आहे. याचा अर्थ पीपीएफ खात्यावर मिळणार्‍या व्याजावर आपल्याला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. नवीन टॅक्स स्लॅबचा स्वीकार करणार्‍या लोकांना त्याचा लाभ मिळतच राहील. नवीन टॅक्स स्लॅबमध्ये प्रामुख्याने बदल हा कपातीशी संबंधित आहे. उदा. नव्या कर रचनेत कलम 80 सीनुसार मिळणारी कपात (ईएलएसएस/ जीवन विमा हप्ता आदी), कलम 80 डीनुसार मिळणारी कपात (मेडिक्लेम आदी) तसेच गृह कर्जावरील व्याजावर मिळणारी कपात आदी गोष्टी वगळल्या आहेत.

स्टँडर्ड डिडक्शन

वेतनदार आणि निवृत्ती वेतन मिळणार्‍या लोकांना मिळणार्‍या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ हा दोन्ही टॅक्स स्लॅबमध्ये कायम ठेवला आहे. सध्याचे स्टँडर्ड डिडक्शन 50 हजार रुपये आहे. सांगायचे तात्पर्य एवढेच की, आपण नवीन टॅक्स स्लॅब निवडा किंवा जुनी व्यवस्था असली, तरी 'पीपीएफ'च्या खात्यात जमा होणारे व्याज हे करमुक्त असेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news