Lok Sabha Election 2024 Results : पहिल्या फेरीपासूनच शाहू महाराज आघाडीवर

Lok Sabha Election 2024 Results : पहिल्या फेरीपासूनच शाहू महाराज आघाडीवर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांनी निर्विवाद विजय मिळविला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून शाहू महाराज आघाडीवर होते. संजय मंडलिक यांना कागलमधूनही अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नाही. मतमोजणीच्या सर्वाधिक 31 फेर्‍या राधानगरी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या राहिल्या, तर सर्वात कमी 23 फेर्‍या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील झाल्या.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथे शासकीय गोदामामध्ये झाली. लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणार्‍या सहा विधानसभा मतदारसंघ निहाय सहा ठिकाणी मतमोजणी झाली. प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणीसाठी चौदा टेबल लावण्यात आले होते. त्यासाठी प्रत्येक पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

संपूर्ण जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रथम टपाली आलेल्या मतपत्रिकांचे स्कॅनिंग सुरू करण्यात आले. त्यानंतर ईव्हीएम मशिनवरील मतमोजणीस प्रत्यक्ष सकाळी नऊ वाजता प्रारंभ झाला. पहिल्या फेरीतील मते मोजून होण्यापूर्वीच नागरिकांकडून विचारणा होत होती. दहा वाजण्याच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. पहिल्याच फेरीत शाहू महाराज यांना 6 हजार 224 मतांची आघाडी मिळाली. कागल व चंदगड वगळता अन्य विधानसभा क्षेत्रात शाहू महाराज यांना आघाडी मिळाली. पहिल्या फेरीत मोजण्यात आलेल्या 54 हजार 541 मतदानापैकी शाहू महाराज यांनी 29 हजार 604 तर संजय मंडलिक यांना 23 हजार 380 मते मिळाली.

अकरा वाजण्याच्या सुमारास दुसर्‍या फेरीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये देखील शाहू महाराज यांचे 5 हजार 674 इतके मताधिक्य मिळाल्याने त्यांची आघाडी 12 हजारांवर गेली. दुसर्‍या फेरीत मोजण्यात आलेल्या 50 हजार 954 मतदानांपैकी 27 हजार 652 मते शाहू महाराज, तर 21 हजार 978 मंडलिक यांना पडली. त्यामुळे मताधिक्य 18 हजार 513 झाले.

तिसर्‍या फेरीत शाहू महाराज यांना 30 हजार 907 तर मंडलिक यांना 24 हजार 396 मते मिळाले. या फेरीत 6 हजार 511 मताधिक्य 25 हजार 24 इतके झाले. प्रत्येक फेरीत शाहू महाराज यांना मिळणारे मताधिक्य पाहून मंडलिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. चौथ्या फेरीत शाहू महाराज यांचे मताधिक्य 25 हजारांवर गेले. या फेरीत शाहू महाराज यांना 35 हजार 363 तर मंडलिक यांना 27 हजार 856 मते मिळाली.

पाचव्या फेरीत 54 हजार 421 मते मोजण्यात आली. त्यामध्ये काँग्रेसला 30 हजार 133 तर शिवसेनेला 22 हजार 961 मते मिळाली. सहाव्या फेरीत मोजण्यात आलेल्या 54 हजार 185 मतांपैकी काँग्रेसला 28 हजार 958 तर शिवसेनेला 23 हजार 826, सातव्या फेरीतील 54 हजार 451 पैकी काँग्रेसला 30 हजार 813 तर शिवसेनेला 22 हजार 349 मते मिळाली. आठव्या फेरीत 54 हजार 425 मतांपैकी काँग्रेसला 30 हजार 504 तर शिवसेनेला 22 हजार 315 मते मिळाली. नवव्या फेरीत काँग्रेसला 25 हजार 851 तर शिवसेनेला 22 हजार 413 मते मिळाली. दहाव्या फेरीत 27 हजार 478 काँग्रेसला तर शिवसेनेला 21 हजार 952 मते मिळाली. पहिल्या दहा फेर्‍यांमध्ये शाहू महाराज यांना आघाडी मिळत गेल्याने दहाव्या फेरीअखेर त्यांची आघाडी 66 हजार 907 झाली.

अकराव्या फेरीत 34 हजार 118 काँग्रेसला, तर शिवसेनेला 21 हजार 668 मते मिळाली. बाराव्या फेरीत 29 हजार 779 काँग्रेसला, तर शिवसेनेला 20 हजार 950 आणि तेराव्या फेरीत काँग्रेसला 31 हजार 510, शिवसेनेला 27 हजार 517 मते मिळाली. चौदाव्या फेरीत 31 हजार 579 काँग्रेसला, तर शिवसेनेला 28 हजार 94 मते मिळाली. पंधराव्या फेरीत काँग्रेसला 28 हजार 974, तर 28 हजार 148 शिवसेनेला, सोळाव्या फेरीत काँग्रेसला 27 हजार 56, तर शिवसेनेला 23 हजार 352 मते मिळाली. सतराव्या फेरीत काँग्रेसला 27 हजार 922 व शिवसेनेला 24 हजार 249 मते मिळाली. अठराव्या फेरीत काँग्रेसने 28 हजार 371, तर शिवसेनेने 25 हजार 387 मते घेतली. एकोणिसाव्या फेरीत काँग्रेसला 26 हजार 330 व शिवसेनेला 23 हजार 623 मते मिळाली. विसाव्या फेरीत काँग्रेसने 27 हजार 835 व शिवसेनेने 23 हजार 392 मते मिळविली.

प्रत्येक फेरीत जादा मते घेणारे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांचे विसाव्या फेरीअखेर 1 लाख 10 हजार 936 मताधिक्य झाले. 21 व्या फेरीत काँग्रेसला 28 हजार 206, तर शिवसेनेला 19 हजार 570 मते, 22 व्या फेरीत काँग्रेसला 29 हजार 299, शिवसेनेला 21 हजार 797 मते मिळाली. 23 व्या फेरीत 28 हजार 342 काँग्रेसला, तर शिवसेनेला 18 हजार 373 मते मिळाली.

24 व्या फेरीत 20 हजार 472 काँग्रेसला व 15 हजार 944 मते शिवसेनेला मिळाली. 25 व्या फेरीत 20 हजार 211 काँग्रेस व शिवसेनेला 14 हजार 38 मते मिळाली. 26 व्या फेरीत 11 हजार 662 काँग्रेसला, तर शिवसेनेला 8 हजार 358 मते मिळाली.

27 व्या फेरीत पहिली आघाडी संजय मंडलिक यांना मिळाली. या फेरीत मंडलिक यांना 7 हजार 440, तर शाहू महाराज यांना 6 हजार 548 मते मिळाली. 28 व्या फेरीत काँग्रेसला 4 हजार 600 आणि शिवसेनेला 4 हजार224 मते मिळाली. 29 व्या फेरीत 3 हजार 807 काँग्रेसला व शिवसेनेला 3 हजार 759 मते मिळाली. 30 व्या फेरीत काँग्रेसला 5 हजार 498, तर शिवसेनेला 2 हजार 601 मते आणि अखेरच्या 31 व्या फेरीत 1 हजार 31 काँग्रेसला, तर 804 मते शिवसेनेला मिळाली.

विसाव्या फेरीनंतर मात्र संजय मंडलिक यांचे प्रतिनिधी मतदान केंद्रातून जाऊ लागले. त्यामुळे मतदान केंद्रातील गर्दी कमी झाली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणार्‍या विधासनभा मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबटिकर आहेत. तरीही या मतदारसंघातून काँग्रेसचे शाहू महाराज यांना प्रचंड मताधिक्य मिळाले. करवीर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले होते. या तालुक्यातून जास्तीत जास्त आघाडी घेण्याचे प्रयत्न केले होते. त्यात यश आले. मंडलिक यांना कागल आणि चंदगड तालुक्यांतून खूप मोठ्या आघाडीची अपेक्षा होती; परंतु त्यांना येथून अपेक्षित आघाडी शेवटपर्यंत मिळाली नाही. उलट दहाव्या फेरीत कागलमधून काँग्रेसचे शाहू महाराज यांनी 375 मतांची आघाडी घेतली, तर अकराव्या फेरीत चंदगडमधून 2 हजार 228 मतांची आघाडी घेतली. यानंतर मात्र मंडलिक गटाचे कार्यकर्ते अधिकच अस्वस्थ झाले. त्यांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली. कोल्हापूर दक्षिणमध्ये आपले वर्चस्व राखण्यासाठी आ. सतेज पाटील व महादेवराव महाडिक गटांत कायम संघर्ष सुरू असतो. निवडणूक कोणतीही असो, यामध्ये दोघेही आपले वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न करतात. या मतदारसंघात संजय मंडलिक यांना काही फेर्‍यांमध्ये आघाडी मिळाल्याचे दिसते. त्याचप्रमाणे कोल्हापूर उत्तरमध्येदेखील काही फेर्‍यांमध्ये मंडलिक यांनी आघाडी घेतली.

शाहू महाराजांना बावडेकरांची साथ

आ. सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असलेला कसबा बावडा व गगनबावडा येथून शाहू महाराज यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे. कसबा बावड्यातून 22 हजार 615 पैकी 14 हजार 115 मते, तर गगनबावडा तालुक्यातून 23 हजार 131 पैकी 14 हजार 870 मते काँग्रेसला मिळाली आहे. दोन्ही मिळून 13 हजार 959 इतके मताधिक्य शाहू महाराज यांना मिळाले आहे.

संजय मंडलिक यांची उपस्थिती

संजय मंडलिक सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मतमोजणी केंद्रात आले होते. फेरीनिहाय ते मतदानाची माहिती घेत होते. प्रत्येक फेरीत शाहू महाराज यांना मताधिक्य मिळत होते. पंधराव्या फेरीनंतर कल लक्षात येताच ते मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले.

काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांनी मतमोजणीसाठी आपली खास यंत्रणा ठेवली होती. त्यामुळे मतदान केंद्रातील अधिकार्‍यांपेक्षा लवकर आकडेवारी दोन्ही उमेदवारांच्या यंत्रणेद्वारे बाहेर कार्यकर्त्यांना मिळत होती.

तिसर्‍या फेरीत राधानगरी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या ठिकाणी तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे त्यानंतरच्या निकालास विलंब लागत गेला. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी अतिशय संथ होती. कागल तालुक्यातील मतमोजणी गतीने होत होती.

पोस्टल मतदानात शाहू महाराज आघाडीवर

पोस्टल मतांमध्ये महाविकास आघाडीचे शाहू महाराज यांना 4 हजार 199, तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना 2 हजार 544 मते मिळाली. एकूण 7 हजार 938 मतदारांनी पोस्टल मतदानाचा हक्क बजावला.

मंडलिकांना केवळ कागलमध्ये मताधिक्य

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना 1 लाखाच्या पुढे मताधिक्य एकट्या कागल मतदारसंघातून मिळेल, असा प्रचार करण्यात आला होता; पण प्रत्यक्षात कागलमध्ये संजय मंडलिक यांना 13 हजार 858 चे मताधिक्य मिळाले. त्यांना कागलमधून मतदारांची अपेक्षित साथ मिळाली नाही. कागलमध्ये संजय मंडलिक यांना 1 लाख 27 हजार 881, तर शाहू महाराज यांना 1 लाख 14 हजार 23 मते मिळाली. अन्य मतदारसंघात शाहू महाराज यांनी आघाडी घेतली.

नोटाला 5 हजार 983 मते

कोल्हापूर लेाकसभा मतदारसंघातून एकाही उमेदवाराला पसंती न दिलेल्या मतदारांची संख्या 5 हजार 983 इतकी होती. यामध्ये चंदगड मतदारसंघातून 887, राधानगरी 611, कागल 956, कोल्हापूर दक्षिण 1527, कोल्हापूर उत्तर 1259, तर पोस्टल मतदानात 51 जणांनी नोटाचे बटन दाबले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news