रेल्वे मेगा ब्लॉक; एसटी, रेल्वे स्थानके गर्दीने फुल्ल..! प्रवाशांच्या रांगा

रेल्वे मेगा ब्लॉक; एसटी, रेल्वे स्थानके गर्दीने फुल्ल..! प्रवाशांच्या रांगा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यासाठी घेतलेल्या 36 तासांच्या ब्लॉकमुळे शुक्रवारी (दि.31) प्रवाशांना पुणे-मुंबई प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागली. मुंबईला जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसली, तर एसटीच्या स्थानकांवर तिकिटासाठी शुक्रवारी रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे अशी स्थिती रविवारी (दि. 2) सायंकाळपर्यंत असणार आहे.

त्यासोबतच महामार्गांवरदेखील कोंडी पाहायला मिळणार आहे. पुणे-मुंबई प्रवास करणारे चाकरमानी, उन्हाळ्याच्या सुट्यांवरून पुन्हा घरी परतणारे आणि विकेंड सुटीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पर्यटक प्रवासी, असे तीनही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवाशांची शनिवारी आणि रविवारी गर्दी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कुठे कोंडी, तर कोणत्या स्थानकांवर गर्दी, तिकिटासाठी रांगा असे चित्र पुढील दोन दिवस दिसणार आहे. असे चित्र शुक्रवारीच दिसायला सुरुवात झाली आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी…

पुण्यातून मुंबईला जाणार्‍या आणि येणार्‍या डेक्कन क्वीन, डेक्कन, सिंहगड, प्रगती, वंदेभारतसह अनेक मेल एक्स्प्रेस गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. मात्र, काही प्रवाशांना याबाबत माहिती नसल्याने अनेक प्रवासी पुणे रेल्वे स्थानकावर आल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले. त्यामुळे येथून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या काही गाड्या व शॉर्ट टर्मिनेट असलेल्या गाड्यांना गर्दी दिसली. पुणे रेल्वे स्थानकावरदेखील गर्दी झाल्याचे शुक्रवारी दिसले.

पुणे स्टेशन एसटी स्थानकावर रांगा…

रेल्वे बंदची माहिती नसलेल्या अनेक प्रवाशांनी पर्यायी वाहनाचा शोध शुक्रवारी घेतला. यात कोणी खासगी बस, कार, टॅक्सीने पुणे स्थानकावरून मुंबईकडे रवाना झाले, तर अनेक प्रवाशांनी एसटीचा पर्याय शोधला. त्यामुळे पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकावरील आरक्षण खिडकीवर प्रवाशांच्या रांगा शुक्रवारी पाहायला मिळाल्या.

पुणे-मुंबई महामार्गावर कोंडी…

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या ब्लॉकमुळे प्रवाशांना पुणे-मुंबई प्रवास करताना मोठी कसरत करावी लागली. यामुळे प्रवासासाठी अनेक प्रवाशांनी खासगी आणि स्वत:ची वाहने रस्त्यावर उतरवली. परिणामी, नेहमीपेक्षा जादाच वाहने रस्त्यावर धावल्याने पुणे-मुंबई जुन्या आणि नवीन महामार्गावर काही ठिकाणी शुक्रवारी कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. यापेक्षा अधिक कोंडी शनिवारी आणि रविवारी होणार आहे. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी कोंडीच्या नियोजनासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news