दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून घेण्यात येणार आहे. यामध्ये बारावीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्ट, तर दहावीची पुरवणी परीक्षा 16 ते 30 जुलै या कालावधीत होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेची लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 16 ते 30 जुलै या कालावधीत होणार आहे, तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 16 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. तसेच, बारावीच्या माहिती तंत्रज्ञान, सामान्यज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने 7 आणि 8 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.
पुरवणी परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www. mahahsscboard. in या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारपासून (दि. 3 जून) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. परीक्षेच्या तारखांची खात्री करून परीक्षा द्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा  व्हॉट्सअ‍ॅप किंवा अन्य माध्यमांतून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नयेे.

असा आहे परीक्षेचा कालावधी

  • बारावी (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) :  16 जुलै ते 8 ऑगस्ट
  • बारावी (व्यवसाय अभ्यासक्रम) :  16 जुलै ते 3 ऑगस्ट
  • दहावी : 16 ते 30 जुलै

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news