पुण्याचे रिक्षाचालक मायानगरीत; परिवहन आयुक्त कार्यालयासमोर सर्व एकवटले

पुण्याचे रिक्षाचालक मायानगरीत; परिवहन आयुक्त कार्यालयासमोर सर्व एकवटले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रिक्षा उशिरा पासिंग केल्यावर प्रतिदिन 50 रुपयांचा दंड परिवहन विभागाकडून आकारला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर दै. 'पुढारी'कडून नुकतेच वृत्त प्रसिध्द करण्यात आले. त्यामुळे पुण्यातील रिक्षाचालकांनी एकत्र येत, थेट मुंबईतील परिवहन आयुक्त कार्यालय गाठले. ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन, ऑटो टॅक्सीचालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य, पुणे पिंपरी चिंचवड शहरातील, ऑटो टॅक्सी संघटनांची बैठक बुधवारी (दि. 29) मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये बैठक झाली. या वेळी महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, सह परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, अतिरिक्त सह परिवहन आयुक्त कळसकर, कैलास कोठावले, पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर व इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते.

या रिक्षा संघटनांची उपस्थिती…

ऑटो टॅक्सी रिक्षा बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व कृती समितीचे संस्थापक बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, मनसे वाहतूक विभागाचे किशोर चिंतामणी, शिवनेरी रिक्षा संघटनेचे अशोक साळेकर, सावकाश रिक्षा संघटनेचे प्रदीप भालेराव, विद्यार्थी वाहतूक संघटनेचे बापू भावे, आझाद रिक्षा संघटनेचे शफिक पटेल, महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम तांदळे, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बापू धुमाळ, एमआयएम रिक्षा संघटना कार्याध्यक्ष महमूद शेख, रिक्षा संघटना समन्वयक तुषार पवार व पुणे शहरातील अन्य रिक्षा संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

कोविडनंतर पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील ऑटो टॅक्सीचालकांचे अतोनात हाल झाले असून, अशा परिस्थितीमध्ये त्यांना रोज पन्नास रुपये प्रतिदिवस दंड लावणे, हे अत्यंत चुकीचे व जुलमी आहे, या विरोधामध्ये, रिक्षा टॅक्सीचालक-मालकांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त केला जात असून महाराष्ट्र व केंद्र सरकारने, तातडीने हा दंड रद्द करून, रिक्षाचालकांचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा मुंबई, पुणेसह महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

– बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो टॅक्सी रिक्षा बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन

रस्त्यावरच्या लढाईबरोबरच आम्ही न्यायालयीन लढाइचा पर्याय देखील खूला ठेवला असून, या निर्णयाविरोधामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागणार आहे.

– आनंद तांबे, संस्थापक अध्यक्ष, समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान

परिवहन विभागाच्या मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये यापूर्वी देखील आम्ही मोठे आंदोलन केले, असून याबाबत देखील लवकरात तीव्र आंदोलन उभारले जाईल.

– किशोर चिंतामणी, मनसे वाहतूक विभाग

पुणे शहरातील सर्व संघटना या प्रश्नावर एकत्र आल्या असून, आम्ही सर्व एकजुटीने या निर्णयाला तीव्र विरोध करणार आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी आमची रस्त्यावर देखील उतरण्याची तयारी आहे.

– अशोक साळेकर, शिवनेरी रिक्षा संघटना

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news