पाणी टंचाई! पाण्यासाठी करंजी ग्रामस्थांचे उपोषण

पाणी टंचाई! पाण्यासाठी करंजी ग्रामस्थांचे उपोषण

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील करंजी येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, ही टंचाई तातडीने दूर करा, या मागणीसाठी बुधवारी (दि. 29) तेथील संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले. माजी सरपंच बाळासाहेब अकोलकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. येत्या तीन दिवसांत गावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

करंजीसह वाड्या-वस्त्यांसाठी दररोज साडेतीन हजार लिटर पाणी टँकरने देण्यास प्रशासनाने मंजुरी दिली असली तरीही प्रत्यक्षात कमी पाणी मिळते. त्यातून गावची पिण्याच्या पाण्याची तहान भागत नसल्याने करंजी ग्रामस्थांसह महिलांनी पंचायत समिती कार्यलयासमोर उपोषण सुरु केले. या आंदोलनात अकोलकर यांच्यासह विजया अकोलकर, संगीता अकोलकर, रुपाली अकोलकर, अलका अकोलकर, सुरेखा आहेर, अर्चना अकोलकर, इंदू अकोलकर, सविता दानवे, नवनाथ आरोळे, मारुती क्षेत्रे, जालिंदर वामन, आबासाहेब अकोलकर, सचिन क्षेत्रे सहभागी झाले होते.

नेमकी समस्या काय?

अकोलकर म्हणाले, मंजूर झाल्याप्रमाणे टँकरच्या खेपा टाकल्या जात नाहीत. बारा टायर असलेल्या टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र, हा टँकर वाड्या-वस्त्यावर अरुंद रस्ते असल्याने जात नाही. टँकर करंजी गावठाणातील टाकीमध्ये खाली केला जात असल्याने वाड्या-वस्त्या तहानल्या आहेत. गावठाणा मधील पाणीपुरवठ्यासाठी मिरी प्रादेशिक योजनेचे पाणी नियमित मिळावे, यासाठी दोन महिन्यांपूर्वी ग्रामविकास अधिकार्‍यांकडे मागणी करण्यात आली.

मात्र, त्यांनी कार्यवाही न केल्याने गावठाणामधील वाड्या-वस्त्यां वरील रहिवाशांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. ग्रामविकास अधिकार्‍यांना अनेकदा टंचाईसंदर्भात चर्चा करण्यासाठी मासिक बैठक बोलवावी म्हणून सूचना करूनही त्यांनी बैठख बोलविली नाही. उलट तुम्ही व सरपंच पाहून घ्या, अशी दुरुत्तरे दिली.

सरपंचांचा मनमानी कारभार

सरपंच, उपसरपंच हे पाणीटंचाईच्या नियोजनासंदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा करीत नाही. ते मनमानी कारभार करीत आहेत. मोठ्या टँकरऐवजी लहान टँकर उपलब्ध होऊन वाढीव खेपा मंजूर करून त्या प्रमाणात टँकर द्या, टँकरचे पाणी गावठाण टाकीमध्ये खाली न करता टँकरने वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा जलद गतीने करा. प्रादेशिक नळयोजनेचे पाणी गावठाण टाकीत द्या, अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा अकोलकर यांनी दिला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news