

पुणे: पुणे महापालिकेतील महिला वैद्यकीय अधिकार्याच्या कक्षात जमावासह जबरदस्तीने प्रवेश करून दमदाटी व अपशब्द वापरल्याप्रकरणी ओंकार कदम व अन्य सात जणांना महापालिकेने प्रवेशबंदी घातली आहे. यामध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचार्यांचाही समावेश आहे.
सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांना पत्र देत संबंधितांविरोधात कार्यवाहीची विनंती केली आहे. 6 जून रोजी कदम याने पालिकेच्या पत्रकार कक्षात कोणतीही परवानगी न घेता पत्रकार परिषद घेतली होती. या वेळी 25 ते 30 जणांचा समूह त्याच्यासोबत होता. (Latest Pune News)
पत्रकार परिषदेनंतर या समूहातील काही महिला व पुरुषांनी महापालिकेच्या हिरवळीवर फेसबुक लाइव्ह करत महिला वैद्यकीय अधिकार्याविरोधात अर्वाच्य भाषा वापरली व दमदाटी केली. ही बाब गंभीर असून संबंधित अधिकार्यांच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे विटकर यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
या प्रकारात सहभागी असलेल्या कंत्राटी कर्मचार्यांमध्ये विशाल जाधव, रेखा ससाणे, सविता पवार, रेश्मा चिल्लाळ, सारिका गोरड आणि मीना धोत्रे यांचा समावेश आहे. या सर्वांना महापालिकेच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली असून याची माहिती संबंधित कंत्राटदारांनाही देण्यात येणार आहे.
दरम्यान, या घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिकेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. संबंधित सर्व व्यक्तींना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना प्रवेशबंदीचे कारण आणि परिणाम समजावून सांगण्यात यावेत, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसेच, त्यांची ओळख पटवून अधिकृतपणे प्रवेशबंदीबाबतची कारवाई स्पष्ट करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.