मोशीत नालेसफाई कागदावरच; साधन सामग्री उपलब्ध होत नसल्याचे कारण

मोशीत नालेसफाई कागदावरच; साधन सामग्री उपलब्ध होत नसल्याचे कारण

मोशी : पावसाळा तोंडावर आला असूनही मोशी परिसरातील नाल्यांची सफाई अर्धवट राहिलेली दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत असून, डासांचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी नालेसफाई कधी होणार, याचा सवाल महापालिका प्रशासनाला विचारला आहे.

नाल्यात झाडे-झुडपे

मोशीत एकूण 3 नाले आहेत. एक बोराटेवस्ती, दुसरा कुदळेवस्ती येथून उगम पावतो. पुणे-नाशिक महामार्गाच्या पूर्वेला हे नाले आहेत. तर, तिसरा नाला सावतामाळीनगर येथून उगम पावतो. या तिन्ही नाल्यांची सफाई पूर्ण झालेली नसून फक्त दर्शनी भागात सफाई केलेली दिसत आहे. या तिन्ही नाल्यांतून ड्रेनेजलाईन गेल्या आहेत. मात्र, त्या ठिकठिकाणी फुटल्याने घाण पाणी उघड्यावरूनच वाहत आहे. नालेसफाई करण्यासाठी कर्मचारी येऊन गेले होते. मात्र, नाल्यांची घाण पूर्णतः काढली गेली नाही. तसेच, नाल्यातील झाडे-झुडपे छाटली गेली नाहीत. त्यामुळे नाल्यांमध्ये कचरा अडकून
राहिला आहे.

दुर्गंधीने नागरिक त्रस्त

मागील अनेक वर्षांपासून बोराटेवस्ती येथील नाल्याबाबत महापालिकेच्या पर्यावरण तसेच आरोग्य विभागात तक्रार दाखल केल्या आहेत. बोराटे वस्तीच्या पूर्वेकडून वाहणा-या नाल्यातून मोशी कचरा डेपोतून येणारे पाणी नाल्यातील मोठमोठ्या खड्ड्यात साचून राहते. अनेक प्रकारचा कचरा अडकून राहतो. मात्र, तात्पुरते काम केले जाते. मोशी कचरा डेपोतून येणारे दुर्गंधीयुक्त काळे पाणी गेल्या 7 ते 8 वर्षांपासून या नाल्यातून वाहत आहे. यामुळे येथील नागरिक व शेतकरी शेतात काम करताना तोंड बांधून नाईलाजास्तव शेतीकाम करत आहे.

नाल्यात अनेक अडथळे असल्याने दुर्गंधीयुक्त पाणी साचून राहते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. नालेसफाई करून पाणी बंदिस्त वाहिनीतून जाण्याची व्यवस्था करण्यात यावी.

– संतोष बोराटे, स्थानिक नागरिक

 

नाल्याच्या काठावर राहणार्‍या स्थानिकांना मागील अनेक वर्षांपासून दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळेस तक्रार करूनदेखील यावर कायमस्वरूपी उपाययोजना होईल की नाही, असा प्रश्न सतावत असतो.

– बाजीराव हजारे, स्थानिक नागरिक

 

मोशी परिसरातील नाल्यांची किती साफसफाई झाली याची पाहणी केली जाईल. यासाठी अधिकार्‍यांना पाठविण्यात येणार आहे.

– राजेश आगळे, क्षेत्रीय कार्यालय विभागप्रमुख, ई प्रभाग

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news