दापोडी-निगडी गे्रडसेपरेटरमध्ये पुन्हा बदल; तीनशे कोटींचा खर्च अपेक्षित

दापोडी-निगडी गे्रडसेपरेटरमध्ये पुन्हा बदल; तीनशे कोटींचा खर्च अपेक्षित

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दापोडी ते निगडी 61 मीटर रुंंदीच्या 12.50 किलोमीटर अंतराच्या ग्रेडसेपरेटर मार्गावर सुरक्षित आणि सुलभपणे वाहतूक व्हावी म्हणून येथील मर्ज इन आणि मर्ज आऊटमध्ये पुन्हा बदल करण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने घेतला आहे. अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार या मार्गाची नव्याने रचना करण्यात येत आहे. या बदलास वाहतूक पोलिसांनीही सहमती दिली असून, त्याप्रमाणे बदल करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यासाठी 300 कोटींहून अधिकचा खर्च
अपेक्षित आहे.

चौकांच्या सौंदर्यास बाधा

या मार्गावर दापोडीच्या हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाण पुलापर्यंत महामेट्रोने मेट्रो मार्गिका बनविली आहे. महामेट्रोने मनमानी कारभार करीत या मार्गावरील अनेक ठिकाणचे मर्ज इन आणि मर्ज आऊट अनेक ठिकाणी बदलेले आहेत. काही ठिकाणी नव्याने मर्ज इन व मर्ज आऊट तयार केले आहेत. मेट्रो स्टेशनची उभारणी करताना चौक व पदपथाची रचना बदलली आहे. त्यामुळे प्रशस्त चौक व रस्ते अरुंंद झाले आहेत. तसेच, चौकांच्या सौंदर्यास बाधा निर्माण झाली आहे.

अपघात होण्याचा धोका

तसेच, महापालिकेनेही अनेकदा मर्ज इन आणि मर्ज आऊटमध्ये बदल केले आहेत. काही ठिकाणी अनावश्यक बदल केले गेले. त्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो. नियमाकडे दुर्लक्ष करीत वाहनचालक अनेकदा विरुद्ध बाजूने वाहने नेतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. त्यात या मार्गावर बीआरटीचा दुहेरी मार्ग आहे. पीएमपी बस सिग्नलला जुमानत नसल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहतूक करावी लागत आहे. बीआरटी मार्गावरील बसना सिग्नल वेळ स्वतंत्र दिला जात असल्याने खासगी वाहनांना अधिक वेळ सिग्नलवर टाकळत थांबावे लागते.

आता महापालिकेने दापोडी ते निगडी मार्गाचे अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार नव्याने सुशोभीकरण करण्याचे निर्णय घेतला आहे. त्यासाठी तब्बल 300 कोटींपेक्षा अधिकचा खर्च केला जाणार आहे. एका बाजूचा मार्गासाठी 144 कोटींच्या खर्चास मार्च 2024 ला स्थायी समितीची मान्यता देण्यात आली आहे. तसेच, मर्ज इन आणि मर्ज आऊटचेही काम केले जाणार आहे.
या मार्गावरील ग्रेडसेपरेटर रस्त्याचे सुधारित नियोजन करुन महापालिकेने मर्ज इन आणि मर्ज आऊटचे पुनर्बांधकाम सुरू केले आहे. ते नियोजन करताना नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यात एकूण 590 सूचना व हरकती प्राप्त झाल्या आहे. वाहतूक पोलिस आणि नागरिकांसमवेत बैठक घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली. त्यांच्या सहमतीने दापोडी ते निगडी मार्गावरील दोन्ही बाजूचे मर्ज इन आणि मर्ज आऊटचे ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्याचे काम करण्यासही सुरूवात करण्यात आली आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

खराळवाडीत दोन्ही बाजूला एकाच ठिकाणी मर्ज इन आणि मर्ज आऊट

पिंपरी चौकातील ग्रेडसेपरेटरमध्ये 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीचे वाहने अडकून पडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यावर अद्याप महापालिका तसेच, वाहतूक पोलिसांनी ठोस उपाय शोधलेला नाही. ती चूक कायम ठेवत नव्या रचनेत खराळवाडीच्या दोन्हीकडून बाजूस मर्ज इन आणि मर्ज आऊट न ठेवता मर्ज इन आणि मर्ज आऊट असे दोन्ही पर्याय देण्यात येणार आहेत. त्यावरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रेडसेपरेटरमधील अडकलेले वाहने बाहेर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा पर्याय दिल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे विरुद्ध बाजूने वाहने येऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रेडसेपरेटरमध्ये अधिक उंचीच्या वाहनांना अटकाव करण्यासाठी नाशिक फाटा चौकात लोखंडी बॅरिकेट्स उभारण्याची किंवा इतर उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

वाहनचालकांचा वेळ जाऊ नये म्हणून बदल

वाहनाचालकांच्या वेळ जाऊ नये. त्यांना थेट प्रवास करता यावा. चौकात व सिग्नलवर वाहनांची नाहक गर्दी होऊ नये, यासाठी हे बदल केले आहे. वाहतूक पोलिस व नागरिकांची चर्चा करून त्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे, असे महापालिकेचे स्थापत्य प्रकल्प विभागाच्या वाहतूक नियोजन विभागाचे कार्यकारी
अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news