दैनिक ‘पुढारी’चा दणका! मद्य दुकानाबाहेर नियमांचे फलक

दैनिक ‘पुढारी’चा दणका! मद्य दुकानाबाहेर नियमांचे फलक

पुणे : मद्य विक्रीच्या दुकानाबाहेर 25 वर्षांखालील व्यक्तींना मद्यविक्री केली जाणार नाही, असे फलक लावण्यात आले आहेत. दैनिक 'पुढारी'च्या दणक्यानंतर हे फलक लावण्यात आले आहेत. तसेच, मद्यसेवनाचा परवाना दाखविल्यानंतर मद्यविक्री केली जात आहे. दैनिक 'पुढारी'ने 'ए,चल दारू आण,' या मथळ्याखाली सोमवारी (दि.27) वृत्त प्रसिद्ध करून वयाचे बंधन झुगारून काही मद्यविक्रेत्यांकडून अल्पवयीन मुलांना मद्यविक्री केली जात असल्याचे वास्तव समोर आणले होते.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन करून कार चालविल्याचे पुढे आले होते. तसेच त्याने दोन पबमध्ये मद्य प्राशन केले. त्यानंतर शहरातील पबमध्ये अल्पयीन मुलांना मद्य विक्री होत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानुसार पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. पोलिसांनी अल्पवयीन मुलांना मद्यविक्री केल्याप्रकरणी संबंधित दोन पबचालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक देखील केली. मुंबई दारुबंदी अधिनियम 1949 नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (एक्साईजचे) काम चालते. त्यानुसार वयाची 25 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीलाच मद्यप्राशन करण्याचा परवाना मिळतो. एक महिना, एक वर्ष आणि कायमस्वरुपी असे तीन प्रकारात हे परवाने असतात.

दैनिक 'पुढारी'च्या शहारातील काही मद्यविक्री करणार्‍या दुकानांची पाहणी केली. त्यावेळी काही ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून नाना शक्कल लढवत दारूची सर्रासपणे खरेदी केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. यामध्ये कोणी वयात आलेल्या म्हणजेच 25 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या आपल्या सज्ञान मित्राला दारू खरेदीसाठी दुकानांवर पाठवत होते. तर कोणी एखाद्या बेवड्यालाच गाठून दारूचे/ पैशाचे आमिष देत, त्यालाच दारू खरेदीला दारूच्या दुकानांमध्ये धाडत होते. अशा शक्कला लढवत अल्पवयीनांकडून सर्रासपणे दारू खरेदी होत असल्याचे समोर आले. याबाबत दैनिक 'पुढारी'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने मद्यविक्री करणार्‍या दुकानांना नियमांचे फलक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दुकानांच्या समोर दर्शनीभागी सूचना फलक लावण्यात आले आहेत.

 हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news