इंदापुरात रस्ते कामात जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया

इंदापुरात रस्ते कामात जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर शहरातील सातपुडा काझी गल्लीत अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी खोदकाम करताना खबरदारी न घेतल्याने मंगळवारी (दि. 28) घरगुती नळपाणी पुरवठ्याची पाइपलाइन फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले, तसेच गल्लीत सर्वत्र पाणी साचले होते.

सातपुडा काझी गल्ली परिसरातील भिसे गिरण ते गानबोटे मंगल केंद्रापर्यंत रस्त्याचे सिमेंट क्राँक्रीटीकरण सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने कोणतीही पूर्वकल्पना न देता रस्ता खोदण्यास सुरुवात केली. या वेळी नगरपालिकेची नळपाणी पुरवठ्याची पाइपलाइन फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी खोदलेल्या रस्त्यात वाहून गेले. संबंधित ठेकेदाराला रस्ता खोदण्यापूर्वी सातत्याने नळपाणी पुरवठा पाइपलाइनची पूर्वकल्पना दिली होती. मात्र त्यांनी काही न ऐकता रस्त्याचे काम चालू केले आणि त्यामुळेच पाइपलाइन फुटून नुकसान झाले. तसेच पाणीही वाया गेले, असे स्थानिक नागरिक क्षीरसागर यांनी सांगितले.

रस्त्याचे काम चालू होते; मात्र पाणीपुरवठा करणार्‍या नागरिकांच्या नळाचे पाइप फुटल्याने पाणी साचले आहे. संबंधित विभागाला तातडीने कनेक्शन जोडून देण्याच्या सूचना केल्या आहेत.

– रमेश ढगे, मुख्याधिकारी, इंदापूर नगरपालिका

रस्त्याचे काम चालू होते, तेथे नगरपालिकेची कोणतीही पाइपलाइन फुटली नाही. सध्या दत्तनगर परिसरातील पाइपलाइन फुटली आहे. ती दुरुस्त झाल्यानंतर या ठिकाणचे पाइप जोडून देण्यात येतील. संबंधित ठेकेदाराने काम सुरू करण्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती.

सुरेश सोनवणे, सहाय्यक पर्यवेक्षक, पाणीपुरवठा विभाग, इंदापूर नगरपालिका

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news