नगर : पुढारी वृत्तसेवा : वडिलांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मित्राला जाब विचारला. मित्राने उलट शिवीगाळ केली. त्यामुळे काठीने मारहाण करून कोयत्याने डोक्यात वार करून मित्राचा खून केल्याची कबुली आरोपी मित्राने दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कौडगाव आठरे येथून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
अविनाश बाळू जाधव (रा. मांडवे ता. पाथर्डी) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर, अमोल नवनाथ आठरे (वय 20, रा. कौडगाव आठरे ता. पाथर्डी, जि. नगर) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी महेश बाळू जाधव (वय 25, रा. मांडवे, ता. पाथर्डी, जि. नगर हल्ली रा. मोगरे वस्ती, साने कॉलनी, झेंडा चौक, पिंपरी चिंचवड, पुणे) यांनी 4 मे 2024 रोजी फिर्यादी म्हटले, भाऊ अविनाश जाधव घरासमोर पढवीमध्ये झोपलेला असताना त्यास कोणीतरी अज्ञात आरोपींनी डोक्यामध्ये धारदार हत्याराने मारहाण करून खून केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर व पोलिस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपीची माहिती मिळत नव्हती. पथकाने मयत अविनाश बाळू जाधव याचे कोणासासोबत यापूर्वी वाद होते काय याचा शोध घेतला. त्यात मयताचे व मित्र अमोल आठरे याच्यासोबत वाद झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे अमोल आठरे याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
मी व अविनाश जाधव दोघे मित्र होतो. अविनाशने मला गांजा पिण्याचे व्यसन लावले. गांजा व दारू पिण्यासाठी पैसे मागत असे. आमचे एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. माझे आई-वडील मला रागावत असे. 1 मे रोजी अविनाशने माझे वडील तिसगाव येथे दूध विकत असताना त्यांना शिवीगाळ करून, हात पाय तोडून टाकण्याची धमकी देत दूध रस्त्यावर ओतून दिले. त्याचा जाब विचारण्यासाठी अविनाशकडे गेलो असता त्याने मलाही शिवीगाळ, दमदाटी केली. याच कारणावरून 4 मे रोजी रात्री 12 वाजता घरातून ऊस तोडण्याचा कोयता घेतला. बाभळ तोडून मोठी काठी घेतली. दुचाकी त्याच्या घरासमोर लावून पढवीत झोपलेल्या अविनाशच्या डोक्यात मारले. तो नशेत असल्याने त्याला काहीच कळत नव्हते. त्याला पुन्हा काठीने मारले. आमच्या झटापाट झाली. तो मारण्यासाठी काहीतरी शोधत होता. त्याचवेळी मी कोयत्याने त्याच्या डोक्यात व पाठीत वार केले. तो मोठ्याने आरडाओरडा करू लागल्याने मी तेथून पळ काढला.
हेही वाचा