सात दिवसांत 400 बस ‘ब्रेक डाऊन’; प्रवाशांचे हाल : प्रशासनाला जाग येणार?

सात दिवसांत 400 बस ‘ब्रेक डाऊन’; प्रवाशांचे हाल : प्रशासनाला जाग येणार?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीच्या गाड्यांचे ब्रेकडाऊन काही केल्या कमी होत नाही. मागील आठवड्यात (सात दिवसांत) पुन्हा चारशेहून अधिक बस रस्त्यातच ब्रेकडाऊन झाल्या आहेत. यामुळे पुणेकर प्रवाशांना कसरत ही आता नित्याचीच ठरलेली आहे. पीएमपीच्या ताफ्यात आता 1948 बस आहेत. त्यातील 1520 बस सरासरी दररोज मार्गावर असतात. यापूर्वी पीएमपीच्या ताफ्यातील बससंख्या अधिक होती. ती आता कमी होत आहे. त्यातच पीएमपीला आता ब्रेकडाऊनचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे ताफ्यात नव्या गाड्या आणि विविध उपाययोजना पीएमपीला कराव्या लागणार आहेत. यासंदर्भात दै. 'पुढारी'कडून सातत्याने आवाज उठविला जात आहे. मात्र, ढीम्म प्रशासनाला जाग येत नाही, असे चित्र दिसून येत आहे.

समिती नेमा; तत्काळ निर्णय घ्या : तज्ज्ञ

पीएमपीकडील बस गाड्या सातत्याने ब्रेकडाऊन होत आहेत. दिवसाला सरासरी 58, तर आठवड्याला 400 बस ब्रेकडाऊन होत आहेत. हे रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाने त्यांच्याकडील निवृत्त अभियंत्यांची आणि मॅकेनिकल क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, यामुळे ब्रेकडाऊन कमी होऊ शकतील. तत्कालीन अध्यक्षा नयना गुंडे यांनी यापूर्वीदेखील अशीच समिती नेमली होती. मात्र, ती बस गाड्यांना सातत्याने लागणार्‍या आगीच्या पार्श्वभूमीवर होती. त्या वेळी केलेल्या समितीमुळे ताफ्यातील बस गाड्यांना आगी लागण्याच्या घटना कमी झाल्या होत्या.

आत्ताही पीएमपी प्रशासनाने ब्रेकडाऊन कमी करण्यासाठी अशीच समिती नेमावी, अशी मागणी पीएमपी तज्ज्ञांकडून केली जात आहे. मात्र, अशी समिती नेमण्यासाठी पीएमपीचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते, सह व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार, मुख्य अभियंता (इंजिनिअर) रमेश चव्हाण, मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे हे अधिकारी काय पाऊल उचलणार आहेत, हे आता आगामी काळात समोर येईल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news