लिंकरोड, चिंचवड येथे अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी; रहिवासी त्रस्त | पुढारी

लिंकरोड, चिंचवड येथे अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी; रहिवासी त्रस्त

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चिंचवड, लिंक रस्त्यावर दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या अरुंद रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होऊन या परिसरातील हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेने त्या ठिकाणी 45 मीटर रुंदीचा रस्ता बनवून ते अतिक्रमण हटवावे, अशी तक्रार करण्यात येत आहे.

पिंपरी कॅम्पातून लिंक रस्त्यावर आल्यानंतर सेंट मदर टेरेसा उड्डाण पूल आहे. तेथे आणि गावडे नगर, चिंचवडगाव भागात लिंक रस्ता 45 मीटर रुंद आहे. तसे महापालिकेने आरक्षण टाकले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आरक्षित जागेत दोन्ही बाजूने दुकाने व हॉटेलचे अतिक्रमण वाढले आहे. दुकाने व हॉटेलसमोर बेशिस्तपणे वाहने रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे रस्ता अरुंंद झाल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होते. यामुळे आजूबाजूच्या हाऊसिंग सोसायट्यांतील रहिवाशांना आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गैरसोयीबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

लिंक रस्त्यावरील अतिक्रमण हटवून 45 मीटर रुंदीचा प्रशस्त रस्ता करावा. त्याबाबत महापालिकेने तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे. रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे, असे रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button