दुष्काळाचे संकट गडद; हजारो वाड्या-वस्त्या तहानलेल्याच | पुढारी

दुष्काळाचे संकट गडद; हजारो वाड्या-वस्त्या तहानलेल्याच

दिगंबर दराडे

पुणे : पुणे विभागात पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या विभागात 757 टँकरने 635 गावांसह 3833 वाड्या-वस्त्यांवरील 13 लाख 65 हजार बाधित लोकसंख्येला पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान, मागील वर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने उजनीसह अन्य धरणांची पाणीपातळी खालावली आहे. याशिवाय विहिरी कोरड्या पडल्याने अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीच मिळत नसल्याने नागरिकांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे.

मे महिन्यात तीव्र पाणीटंचाई जाणवली आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत पाणीटंचाईची समस्या भीषण होत चालली आहे. येत्या काळात पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत असून, पंचायत समितीवर गावा-गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. गावा-गावांतील यात्रांमुळेही टँकरची  मागणी वाढत असल्याचे सांगण्यात आले. आणखी विहिरी व बोअर अधिग्रहण करण्याची कार्यवाही सुरू आहे.

अधिग्रहण केलेल्या विहिरी व बोअरच्या माध्यमातून अनेक गावांतील टँकर भरण्यात येत आहेत. 1 जून 2023 पासून ते 6 सप्टेंबर 2023 चा महाराष्ट्रात पडलेल्या पावसाचा नकाशा पाहिल्यास सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस पडला आहे. प्रत्यक्षात जेवढा पाऊस पडला तो या कालावधीत पडलेल्या पावसाच्या सरासरीच्या 20 ते 59 टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे हे जिल्हे दुष्काळाच्या संकटात सापडले आहेत. सातारा जिल्ह्यात 204, सांगली 108, सोलापूर 193 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या ठिकाणी बाधित लोकसंख्या अधिकची पाहायला मिळत आहे.

पुणे विभागाची पाणीबाणी ठरतेय जीवघेणी

  • पोटाला घ्यावा लागतोय चिमटा
  • उपासमारीचे जीवघेणे संकट घोंघावतेय
  • निवडणुकीमुळे लोकप्रतिनिधींचे
  • दुष्काळाकडे दुर्लक्ष

घरी आई- वडील शेतमजुरी करतात. यंदा दुष्काळामुळे हाताला काम नाही. त्यात वडिलांची तब्येत बिघडलेली. अशात घरी पैसे मागण्याची इच्छा होत नाही. कमीत कमी पैशामध्ये खर्च भागवत आहे. आता अभ्यासाबरोबर खासगीमध्ये नोकरीही करत आहे. तेवढ्यात भागविणे कठीण होत आहे.

– आकाश मोरे, विद्यार्थी, सदाशिव पेठ

मागील अनेक दिवासांपासून गावात मजुरीचेही प्रमाण कमी झाले आहे. मजुरी मिळत नसल्याने नेमका रोजगार कसा मिळवावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाच्या झळा बसत असल्याने काम करायला देखील मन लागत नाही. केलेल्या कामाचे पैसेदेखील वेळेवर मिळत नसल्याने घर कसे चालवायचे? हा प्रश्न समोर उभा
ठाकलेला आहे.

– शीतल खाडे

सध्या तलावांमध्ये पाणी राहिले नाही. बारामतीमधील सुपा परिसरात मेंढ्यांना जगविणे अवघड झाले आहे. नाझर्‍यापासून काही अंतरावर पुढे असणार्‍या न्हावळी गावातल्या शेतकर्‍यांना स्वत:बरोबरच आपल्या मेंढ्यांना कसे जगवायचे, हे संकट उभे राहिले आहे. अनेक जणांना दिवसाची पायपीट करावी लागते, इतकी विदारक परिस्थिती सध्या आहे.

– भाऊसाहेब करे, शेतकरी

हेही वाचा

Back to top button