यंदा पदवीचे प्रवेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसारच! विद्यापीठाकडून महाविद्यालयांना निर्देश | पुढारी

यंदा पदवीचे प्रवेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसारच! विद्यापीठाकडून महाविद्यालयांना निर्देश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील महाविद्यालयांमध्ये यंदा पदवीचे प्रवेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसारच होणार आहेत. गेल्या वर्षी स्वायत्त महाविद्यालयांनी धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. यंदा मात्र संलग्न महाविद्यालयांमध्येही धोरण राबविण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठ 46 तालुक्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एनईपी विषयक 250 हून अधिक कार्यशाळा घेणार असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी दिली आहे.

राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यंदा बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पहिलेच वर्ष असणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एनईपीअंतर्गत झालेल्या बदलांची माहिती देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांतील 46 तालुक्यांमध्ये मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया राबविणार्‍या कर्मचार्‍यांनासुध्दा पुढील 15 दिवसांत आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

डॉ. काळकर म्हणाले, राज्य शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठाने आवश्यक तयारी केली आहे. विद्या शाखा निहाय सर्व विषयांच्या अभ्यास मंडळांच्या माध्यमातून संलग्न महाविद्यालयांतील प्राध्यापकांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. काही कारणास्तव राहिलेल्या प्राध्यापकांसाठी पुन्हा कार्यशाळा घेतली जाणार आहे. तसेच प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेचे काम पाहणार्‍या प्रशासकीय कर्मचार्‍यांना येत्या सोमवारपासून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

स्वायत्त महाविद्यालयांमध्ये एनईपीची अंमलबजावणी सुरू झाली असली, तरी या वर्षांपासून इतर संलग्न महाविद्यालयात एनईपी अंमलबजावणीचे हे पहिलेच वर्ष आहे. त्यामुळे इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात दीड तासाचे एक अशा 4 व्याख्यानांचे आयोजन केले जाईल. गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत याबाबत प्रस्ताव स्वीकारले आहेत. त्यानुसार पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील 46 तालुक्यांमध्ये विद्यार्थ्यांना एनईपी विषयक माहिती दिली जाईल. विद्यापीठातर्फे याबाबतचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

हेही वाचा

Back to top button