pune porsche accident : ’तू बस बाजूला अन् मुलाला गाडी चालवायला दे’ | पुढारी

pune porsche accident : ’तू बस बाजूला अन् मुलाला गाडी चालवायला दे’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालने कारचालकाला ‘मुलाने गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी चालवायला दे आणि तू त्याच्या बाजूला बस,’ अशी सूचना पार्टीला जाण्यापूर्वी केल्याची धक्कादायक माहिती कारचालकाच्या जबाबात समोर आली आहे. दरम्यान, विशाल अगरवाल याच्यासह तिघांना बुधवारी (दि. 22) न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर तिघांनाही
24 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयाने दिले आहेत.

कल्याणीनगर हिट अँड रनप्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (वय 50, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) आणि ब्लॅक पबचा कर्मचारी नितेश धनेश शेवानी (वय 34, रा. एनआयबीएम) आणि जयेश सतीश गावकर (वय 23, रा. केशवनगर) यांना अटक केली आहे.

बाल न्याय मंडळाने दिलेल्या आदेशाविरोधात आम्ही न्यायालयात गेलो होतो. त्यावेळी न्यायालायने बाल न्याय मंडळात पुनर्विचार याचिका दाखल करायला सांगितले होते. त्यानुसार पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळात दोन अर्ज केले होते. मुलाला प्रौढ घोषित करावे, तसेच त्याची रवानगी बाल सुधारगृहात करावी. गुरुवारी बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला सुधारगृहात पाठवण्याची मागणी मान्य केली आहे. 5 जूनपर्यंत त्याला सुधार गृहात ठेवण्यात येईल.

– अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे

कारचालकाचा जबाब महत्त्वाचा

गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपी चालवत असलेल्या पोर्शे कारचालकाचा जबाब नोंदविला. त्यामध्ये त्याने विशाल अगरवाल यानेच पार्टीला मुलाला नेण्यापूर्वी सूचना केली होती. त्यामध्ये त्याने मुलाने गाडी चालविण्यास मागतील तर त्याला गाडी चालविण्यासाठी देण्याची सूचना करत चालकाला बाजूला बसण्यास सांगितले होते. पुढे हीच सूचना चालकाने पाळल्यामुळे त्याच कारने अपघात झाल्याची बाब पोलिस तपासात समोर आली.

24 मेपर्यंत पोलिस कोठडी

आरोपीकडे सखोल तपास करून पुरावे हस्तगत करायचे आहेत. त्यासाठी
आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी केला. तर, त्याला मद्यपान करण्याची परवानगी दिली, असे अ‍ॅड. विभूते यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. सुधीर शहा, अ‍ॅड. अमोल डांगे आणि अ‍ॅड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. न्यायालयाने तीनही आरोपींना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

विशाल अगरवाल याला मंगळवारी (दि. 21) पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. अटकेनंतर त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे एक साधा मोबाईल आढळून आला. त्यातील सिम हे 19 मे रोजी नोंदविले आहे. अगरवाल याने त्याचे मूळ मोबाईल लपून ठेवले. त्यात या गुन्ह्याच्या अनुषंगाने काही पुरावे असू शकतात, असे पोलिसांनी नमूद केले.

शिर्डीला असल्याचे सांगितले

या गुन्ह्याबाबत तपास सुरू केला असता पोलिसांनी अगरवाल याला फोन करून ते कुठे आहेत, याबाबत माहिती विचारली होती. तेव्हा ते पुण्यात असताना देखील त्याने आपण शिर्डीला असल्याची खोटी माहिती दिली, असे या गुन्ह्यातील तपास अधिकारी पोलिस निरीक्षक गणेश माने यांनी न्यायालयात सांगितले.

‘त्या’ पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाडाचा दावा

अपघातग्रस्त पोर्शे कार बंगळुरूमधून खरेदी करण्यात आली होती. या मोटारीत तांत्रिक बिघाड असल्याचे अगरवाल यांच्या निदर्शनास आले होते. गाडीतील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून देण्याबाबत त्याने कंपनीशी वेळोवेळी संपर्क साधला होता. मात्र, कंपनीने त्याची दखल न घेतल्याने याबाबत अगरवाल याने दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली होती. तेथे दाखल असलेली तक्रार अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे गाडीची अद्याप नोंदणी करण्यात आलेली नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. मात्र, त्यावर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. मार्चमध्ये ही कार अगरवाल याने मिळाली होती. कारमध्ये तांत्रिक बिघाड होता, तर ती मुलाला चालविण्यासाठी का दिली? असा प्रश्न उपस्थित करीत गाडीबाबतची पूर्वकल्पना असताना देखील त्याला ती चालवायला देणे गंभीर आहे, असे अ‍ॅड. विभूते यांनी न्यायालयात सांगितले तसेच सात दिवसांच्या पोलिस कोठडीची
मागणी केली.

अगरवालवर शाईफेकीचा प्रयत्न

विशाल अगरवाल याला न्यायालयात आणले तेव्हा न्यायालयाच्या बाहेरच हजर असलेल्या वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाहेरच पोलिसांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच अगरवाल याच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी पूर्णपणे बंद असल्यामुळे कार्यकर्त्यांकडून फेकण्यात आलेली शाई बंदोबस्तास असलेल्या कर्मचार्‍यांच्या अंगावर पडली. या वेळी नागरिकांचा संताप या प्रकरणानंतर व्यक्त होऊ शकतो, याची जाणीव असताना देखील न्यायालयाच्या आवारात आवश्यक बंदोबस्त नसल्याचेच चित्र दिसून आले.

क्लब मेंबरच्या परवान्यावर मुलाला प्रवेश?

अल्पवयीन मुलाला कोणत्या क्लब मेंबरच्या नावाने पबमध्ये प्रवेश मिळाला होता. त्यामुळे विशाल अगरवाल याच्याकडे क्लब मेंबरच्या परवान्याबाबत तपासणी करायची असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांना केला.

मुलाच्या जिवाला धोका निर्माण केला

मुलगा अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे, हे माहिती असताना देखील त्याला मित्रांसोबत पार्टीला बार व क्लबमध्ये जाण्याची संमती दिली. चारचाकी गाडी चालविण्याचा परवाना नसतानाही मुलाला जाणीवपूर्वक कार दिली. त्यामुळेच मुलाने मद्य घेऊन दोघांना कारने धडक दिली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. विशाल अगरवाल याने मुलाच्याही जिवाला धोका निर्माण केला, असा दावा या वेळी करण्यात आला.

कारच्या माध्यमातून आणखी किती गुन्हे?

मार्च महिन्यापासून गाडीला नंबरप्लेट नसून तेव्हापासून ही कार विशाल अगरवाल यांच्याकडे होती. गाडीच्या माध्यमातून करण्यात आलेला एक गुन्हा समोर आला आहे. या पोर्शे गाडीच्या माध्यमातून आणखी काही गुन्हे झाले असण्याची शक्यता तपास अधिकारी पोलिस निरीक्षक गणेश माने यांनी न्यायालयात व्यक्त करताना पोलिस कोठडीची मागणी केली.

हेही वाचा

Back to top button