स्ट्रक्चरल ऑडिटनंतर होर्डिंगचीही तपासणी; महापालिकेची 53 होर्डिंगवर कारवाई

स्ट्रक्चरल ऑडिटनंतर होर्डिंगचीही तपासणी; महापालिकेची 53 होर्डिंगवर कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने परवानगी दिलेल्या आणि स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सादर झालेल्या होर्डिंगचीही तपासणी केली जाणार असून यामध्ये कमकुवत व धोकादायक होर्डिंग निदर्शनास आल्यास ते तातडीने काढण्यात येईल, तसेच अनधिकृत होर्डिंगवर पंधरा दिवसांत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली. दरम्यान, चार दिवसांत शहरातील 53 होर्डिंगवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाने दिली आहे.
घाटकोपर येथील होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यातच शहर आणि जिल्ह्यातही होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली.

एरवी अनधिकृत होर्डिंगबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही त्याकडे डोळेझाक करणार्‍या प्रशासनातील अधिकारी आता कामाला लागले आहेत. मागील चार दिवसांत महापालिकेने शहरातील 53 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली. तसेच अनेक होर्डिंगवरील पत्रे हटविण्यात आले असून लोखंडी सांगाडे अद्यापही जागेवरच दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी होर्डिंग उभारण्यासाठी तयार केलेले फाउंडेशन अत्यंत तकलादू असल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने अनधिकृत आणि अधिकृत होर्डिंग तपासणी सुरू केली. महापालिका परवाना देताना होर्डिंग मालकाकडून सांगाड्याचे स्ट्रक्चरल ऑडिटही करून घेते. परवान्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिटरचा अहवाल आवश्यक असतो. परंतु अनेक ठिकाणी होर्डिंग ज्या इमारतींवर उभारले आहेत, अशा इमारती तीस वर्षे व त्याहून जुन्या आहेत. होर्डिंगच्या स्ट्रक्चरचे ऑडिट केले तरी इमारतीचे ऑडिट केलेले असेलच, हे सांगता येत नाही. किंवा तशी माहिती महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडे नसते. होर्डिंगसाठीचा लोखंडी सांगडा उभारण्यासाठी केलेले फाउंडेशन ऑडिटरच्या दृष्टीने योग्य असले तरी साध्या डोळ्यांनीही त्रुटी आढळून येतात. या पार्श्वभूमीवर स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही जी होर्डिंग धोकादायक वाटतील ती आयुक्तांच्या अधिकारात उतरविण्यात येतील, असे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

रेल्वे हद्दीतील होर्डिंगवर कारवाईचा अधिकार नाही

मंगळवार पेठेतील जुना बाजार येथील चौकात चार वर्षांपूर्वी रेल्वेच्या हद्दीत असलेले होर्डिंग रस्त्यावर कोसळून काहींचा मृत्यू झाला होता. परंतु अल्पावधीतच त्याठिकाणी पुन्हा होर्डिंग उभारण्यात आले. यासंदर्भात बोलताना आयुक्त भोसले म्हणाले, रेल्वे अ‍ॅक्टनुसार रेल्वेच्या हद्दीमध्ये महापालिकेला बांधकाम अथवा आकाशचिन्ह विभागाची परवानगीची आवश्यकता नसते. केवळ जे होर्डिंग महापालिकेच्या रस्त्यांच्या दिशेने असतात, यासाठी महापालिका जाहिरात शुल्क आकारते. रेल्वेच्या जागेवरील होर्डिंगवर कारवाईचा महापालिकेला अधिकार नाही.

पालिका भवनासमोरील होर्डिंगची चौकशी

महापालिका भवनच्या प्रवेशद्वारालगत रस्त्यावर पीएमपीएमएलच्या वतीने होर्डिंग उभारण्यात आले होते. याला आकाशचिन्ह विभागाने परवानगी दिली होती. तसेच होर्डिंग उभारताना अडथळा ठरणार्‍या चिंचेच्या झाडाच्या फांद्या छाटण्याची परवानगी उद्यान विभागाने दिली होती. महापालिकेच्या दारात होर्डिंग उभारले जात असल्याच्या बातम्या आल्यानंतर काही तासांत हे होर्डिंग काढण्यात आले. जागा निश्चित नसताना होर्डिंग उभारण्यास व झाडाच्या फांद्या तोडण्यास परवानगी देणा-या अधिकार्‍यांची चौकशी करण्यात येत असल्याचेही आयुक्त भोसले यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news