पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विभागात रब्बी हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र 11 लाख 49 हजार 266 हेक्टर इतके असून, त्यापैकी 9 लाख 8 हजार 536 हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 79 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे विभागातील पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांत पेरणी झालेल्या पिकास पोषक स्थिती असल्याची माहिती कृषी अधिकार्यांनी दिली. रब्बी हंगामातील पिकाच्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेत जिल्हानिहाय स्थिती पाहता, अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 91 टक्के, सोलापूरमध्ये 75 टक्के आणि पुणे जिल्ह्यात 63 टक्के पेरण्या 21 डिसेंबरअखेर पूर्ण झालेल्या आहेत.
अहमदनगरमध्ये ज्वारीचे पीक पोटरी अवस्थेत असून गहू पीक वाढीच्या स्थितीत आहे. काही भागात हरभरा पिकाची पेरणी बाकी असून करडई, सूर्यफूल व तीळ ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पुणे जिल्ह्यात ज्वारी, गव्हाचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तर हरभरा पिकाच्या पेरण्या अद्यापही सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यात तूर पीक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून, पावसाच्या खंडामुळे पिकाच्या वाढीवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे तूर पिकाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
पुणे विभागात ज्वारी आणि गव्हाच्या पेरण्यांचा टक्का चांगला आहे. अद्यापही उसाच्या काढणीनंतर शेतकरी गहू आणि हरभरा पिकांच्या पेरणीस प्राधान्य देतात. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी पुणे विभागात गव्हाची पेरणी पुढील पंधरवड्यात आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
– रफिक नाईकवाडी, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे.
हेही वाचा