भाजपच्या काळात खेळाडूंना संपवण्याचा घाट; शरद पवार यांचे मत | पुढारी

भाजपच्या काळात खेळाडूंना संपवण्याचा घाट; शरद पवार यांचे मत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात खेळाडूंना सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही सातत्याने काम करीत आहोत. मात्र, भाजपच्या काळात राज्यातील खेळाडूंना संपवण्याचा घाट सुरू आहे, असे खेळाडूंच्या तक्रारींतून दिसून येत आहे. त्यांना न्याय देण्यासाठी एकत्र येऊन काम करावे लागणार असल्याचे प्रतिपदान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी ’थेट सवांद खेळाडूंशी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. उमेदवार रवींद्र धंगेकर, माजी क्रीडामंत्री सुनील केदार, माजी खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या स्मिता गोरे, आजी- माजी क्रीडा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, भाजप व प्रशासनने क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष केले आहे. क्रीडा क्षेत्रातील विविध प्रकारच्या खेळाडूंना सोयीसुविधा नसल्याने त्यांचे कष्ट वाया जात आहेत. त्यामळे महाराष्ट्र मागे येत आहे. क्रीडा क्षेत्राला सोयीसुविधा देण्यासाठी तसेच अधिक प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले आहेत. यापुढील काळातदेखील खेळाडूंचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. मला खेळाच्या क्षेत्रापासून दूर राहावे लागले कारण, 70 वर्षांवरील व्यक्तींनी खेळाच्या संदर्भात काम करायचे नाही, असा कायदा केंद्र सरकारने केला. खेळांमध्ये प्रशासनाने राजकारण आणले नाही पाहिजे. सुनील केदार म्हणाले, पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आमचे सरकार गेल्यामुळे ते काम थांबले. आता नागरिकांनी क्रीडा व खेळाडूंच्या बाजू मांडल्या पाहिजेत. आपली भावी पिढी त्यातून घडणार आहे.

फक्त तुमच्यासारखा वस्ताद पाहिजे

खेळाडू शरद पवार यांच्यासमोर व्यथा मांडत होते. एक तरुण उठला म्हणाला, मी कुस्तीपटू आहे. आम्हाला जास्त काही पाहिजे नसतं, एक मैदान पाहिजे आणि तुमच्यासारखा एक वस्ताद पाहिजे. या वाक्यावर सभागृहात खेळाडूंनी टाळ्या वाजवून दाद दिली आणि शरद पवार यांनीदेखील हसून कुस्तीपटूला दाद दिली.

खेळाडूंनी मांडले प्रश्न

राज्यात ठिकठिकाणी महिलांसाठी अकॅडमी आवश्यक. बालेवाडीत उच्च दर्जाची पायाभूत सुविधा आहे, पण ते वापरता येत नाही.
पुण्याच्या अवतीभवती क्रीडांगणे केली पण त्याची सध्या दुर्दशा झाली आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये खेळाडूंना मिळणार्‍या सुविधा आपल्या राज्यातील खेळाडूंना मिळाव्यात.

हेही वाचा

Back to top button