पोलिस चौकीच्या कामाचे होणार मूल्यमापन! ‘चौकी ऑफ द मंथ’ उपक्रमाची सुरुवात | पुढारी

पोलिस चौकीच्या कामाचे होणार मूल्यमापन! ‘चौकी ऑफ द मंथ’ उपक्रमाची सुरुवात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहराचे पोलिसिंग चौकीकेंद्रित करण्यास आमचे प्राधान्य आहे. चौकीचे मनुष्यबळ वाढविण्यात येणार असून, त्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला आम्ही चौकीच्या कामाचे मूल्यमापन करणार आहोत. त्यासाठी नियमावली तयार करून मापदंड ठरविण्यात आले आहेत. चांगले काम करणार्‍या अधिकार्‍यांचा गौरव होईल; मात्र गैरकृत्यांना अभय देणार्‍यांना आम्ही सोडणार नाही, असा थेट इशाराच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिस चौकी प्रभारींना दिला आहे. शुक्रवारी (दि. 3) आयुक्तालयात पत्रकारांनी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते.

अमितेश कुमार यांनी पदभार घेताच शहरात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, हे स्पष्ट केले. त्याचबरोबर चोरी-छुपे अवैध धंद्यांना अभय देणार्‍या पोलिसांना सोडणार नसल्याचे सांगितले. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला पाहिजे. त्यासाठी अगोदर अवैध धंद्यांना लगाम घातला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. गुन्हेगारांच्या झाडाझडतीचा आयुक्तालयातील पॅटर्न त्यांनी पोलिस चौक्यांपर्यंत राबविण्यास गुरुवारपासून सुरुवात केली आहे. 109 पोलिस चौक्यांत एक हजार सराइतांची परेड घेण्यात आली. पोलिस चौकी प्रभारींना त्याबाबतचे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे.

चौकीचे सक्षमीकरण करण्यासाठी विशेष पावले उचलण्यास आयुक्तांनी सुरुवात केली आहे. पुढील काळात शहराचे पोलिसिंग चौकीकेंद्रित असणार आहे. त्यासाठी मनुष्यबळ वाढवून देण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर तेथील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनेकदा शहरातील मोठ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील महत्त्वाच्या पोलिस चौक्यांचे प्रभारी अधिकारी म्हणून बसण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षकांकडून ‘रेटिंगचे सेटिंग’ केले जाते. परंतु, आयुक्तांनी हे सर्व मोडीत काढण्याचा निर्धार केला आहे. पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी (वरिष्ठ पोलिस निरीक्षक) आपल्या मर्जीतील अधिकार्‍यांच्या हातात ‘वजनदार’ पोलिस चौक्यांचा कारभार देतात. त्यांच्याकडून ‘अर्थपूर्ण’ उद्दिष्ट साध्य करून घेतात. त्यामुळे आता चौकी प्रभारी अधिकार्‍यांना नियमांच्या चौकटीतच कामकाज करावे लागणार, हे मात्र नक्की आहे. नियमात चांगले काम करणार्‍या पोलिस चौकींना ‘चौकी ऑफ द मंथ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

ठाणे प्रभारींना दाखवावे लागणार काम

निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पुणे शहर पोलिस दलात मोठे फेरबदल होणार आहेत. त्यामुळे पोलिस ठाणे प्रभारी अधिकार्‍यांना काम दाखवावे लागणार आहे; अन्यथा काही अधिकार्‍यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नवीन अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे समजते.

हे निकष तपासले जाणार

  • गुन्हेगारी नियंत्रणासाठी प्रयत्न प प्रतिबंधात्मक कारवाई किती केली
  • अवैध धंद्यांवरील कारवाईला प्राधान्य प तक्रारदारांच्या समस्यांचे निराकरण
  • गुन्हेगारांच्या डोजिएर फॉर्मची पूर्तता प नागरिकांसोबत सलोख्याचा समन्वय
  • चौकी हद्दीत दुसर्‍या पथकाने अवैध धंद्यांवर कारवाई केली तर चौकी प्रभारींची खैर नाही

असे होणार मूल्यमापन…

पोलिस चौकीत आलेल्या तक्रारदारांची माहिती प्रत्येक दिवशी एकत्र केली जाणार. त्यांना पोलिस आयुक्तालयातील मुख्य नियंत्रण कक्षातून फोन जाणार. या वेळी त्यांचा पोलिस चौकीतील अनुभव कसा होता? तेथील अधिकारी, कर्मचार्‍यांची वागणूक कशी होती? समस्यांचे निराकरण झाले की नाही? याबाबत माहिती घेतली जाणार. त्याचबरोबर चौकीच्या हद्दीत अवैध धंदे आढळले, तर त्याची गंभीर दखल घेतली जाणार. तसेच, त्या चौकीच्या हद्दीत गुन्हे शाखा किंवा इतर पथकाने कारवाई केली, तर त्याचे परिणाम चौकी प्रभारी अधिकार्‍याला भोगावे लागणार आहेत. अशा विविध निकषांवर चौक्यांचे मूल्यमापन होणार आहे.

साहेब, आमच्याशी ‘खिलवाड’ नको..!

शहरातील अवैध धंद्याची माहिती नागरिक देखील पोलिस आयुक्तांना देतात. त्याची तत्काळ दखल त्यांच्याकडून घेतली जाते. एका पोलिस ठाण्यातील ‘वसुलीभाई’चा प्रताप आयुक्तांच्या कानावर आला. त्यांनी याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. संबंधित ‘वसुलीभाई’च्या ठाणे प्रभारींना आयुक्तांनी चांगलेच फैलावर घेतले. साहेब, आमच्याशी ‘खिलवाड’ नको; अन्यथा आम्ही तुमच्या पोलिस ठाण्यात त्सुनामी आणू, असा दम भरला. आयुक्तांचा रुद्रावतार पाहून प्रभारींची पाचावर धारण बसली असणार, हे मात्र नक्की.

हेही वाचा

Back to top button