PM Narendra Modi Sabha : मोदींमुळे पुण्याला मिळाला आधुनिक चेहरा; उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

PM Narendra Modi Sabha : मोदींमुळे पुण्याला मिळाला आधुनिक चेहरा; उपमुख्यमंत्री फडणवीस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे चार वर्षांत पुण्याचा चेहरामोहरा बदलला असून, पुण्याला आधुनिक चेहरा मिळाला आहे. त्यांनी पुण्याला टेक्नॉलॉजी हब करण्याचे काम केले, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित आयोजित केलेल्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. मोदींनी देशात मेक इन इंडियाचा नारा दिला. यामुळे पूर्वी आयात करावे लागणारे युद्ध साहित्य आता देशातच तयार होत आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा पुण्याचा आहे. विरोधकांची सत्ता आली तर ते पाच वर्षांत पाच पंतप्रधान करण्याचे मनसुबे आखत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील आणि देशातील जनता त्यांचे हे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही. महायुतीच्या उमेदवारांना मते देऊन मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करतील. हा नवीन भारत आहे, हे मोदींनी जगाला दाखवून दिले आहे. मोदींनी मजबूर भारताला मजबूत भारत केले. स्टार्टअप इंडियामध्येही पुणे, मुंबई शहरात सर्वाधिक स्टार्टअप सुरू झालेे, असेही फडणवीस म्हणाले.

टोप्या, उपरणे, शेले अन् बॅचने वेधले लक्ष

कमळाच्या प्रतिकृतीला खड्यांचे कोंदण असलेला बॅच, आम्ही दादांसोबत, मोदी का परिवार, मोदी 3.0 संदेश देणार्‍या टोप्या, भगव्या, निळ्या टोप्या अन् उपरणे आदी प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होते. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते हातात पक्षाचे झेंडे घेऊन जय श्रीरामचा नारा देत होते.

हेलिकॉप्टर पाहण्यासाठी लगबग

हेलिकॉप्टरचा आवाज अन् एलईडी स्क्रीनवर हेलिकॉप्टर दिसताच चिमुकल्यांची ते पाहण्यासाठी धावाधाव दिसून आली. ते नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. मात्र, हेलिपॅडची व्यवस्था लांब असल्याने, तसेच मध्ये पडदे असल्याने चिमुकल्यांना स्क्रीनवरच हेलिकॉप्टर उतरताना पाहावे लागल्याने चांगलाच हिरमोड झाला. सभेसाठी येणार्‍यांसाठी पक्षाच्या वतीने वडा-पाव व छोट्या पाण्याच्या बाटल्यांची सुविधा
करण्यात आली होती.

हेही वाचा

Back to top button