’सहकार संकुल’च्या उभारणीचा मुहूर्त लवकरच; आचारसंहिता संपल्यानंतर शासनस्तरावरून निश्चिती | पुढारी

’सहकार संकुल’च्या उभारणीचा मुहूर्त लवकरच; आचारसंहिता संपल्यानंतर शासनस्तरावरून निश्चिती

किशोर बरकाले

पुणे : राज्याच्या सहकार आयुक्तालयाच्या सहकार संकुल या इमारतीचे बांधकाम येरवड्याऐवजी शिवाजीनगर येथील साखर आयुक्तालयातील उपलब्ध जागेवर करण्याचे निश्चित झाले आहे. त्या बाबतच्या बांधकामाचे नकाशे जवळपास निश्चित झाले असून, सुमारे 24 हजार 303 चौरस मीटरइतके बांधकाम होईल. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ’सहकार संकुल’च्या बांधकामासाठीच्या भूमिपूजनाचा मुहूर्त शासनस्तरावरून निश्चित होण्याची अपेक्षा सहकार विभागातून वर्तविण्यात आली.

सहकार आयुक्तालयाने सहकार या बांधकामासाठी मागणी केली असता शासनाने 4 मार्च 2022 रोजी 94 कोटी 59 लाख रुपयांइतकी प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार येरवडा येथील जागा प्रस्तावित करण्यात आली होती. राज्यातून येणार्‍या शेतकरी व सहकार क्षेत्रातील संस्था प्रतिनिधींना प्रामुख्याने सहकार, साखर आणि कृषी आयुक्तालयात काम पडते. त्यातील साखर आयुक्तालय शिवाजीनगर येथे कार्यरत असून, शेजारीच कृषी आयुक्तालयाच्या कृषी संकुलची उभारणी सुरू झाली आहे. येरवड्याऐवजी शिवाजीनगर येथेच साखर संकुल होण्याकामी दै. ‘पुढारी’ने आवाज उठविला होता. त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी 25 नोव्हेंबर 2023 रोजी साखर संकुल आवारातील संबंधित जागेची पाहणीही केली आहे.

एकाच छताखाली 23 कार्यालये येणार

सहकार आयुक्त कार्यालयाच्या अधिपत्याखाली पुणे शहरात जवळपास 23 कार्यालये कार्यरत आहेत. ही कार्यालये खासगी जागेत असून, त्यांच्या वार्षिक भाड्यापोटी बराच शासकीय निधी खर्ची पडतो. हा खर्च कमी करण्यासाठी आणि सहकार विभागाची पुणे शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालये एका ठिकाणी असण्यासाठी सहकार संकुलच्या इमारतीत प्रशासकीय इमारत आणि याठिकाणी 600 लोक बसतील अशा आसनक्षमतेचे भव्य सभागृह असणार आहे. एकूण 2 लाख 61 हजार चौरस फुटांचे बांधकाम अपेक्षित आहे. सहकार आयुक्तालयासह पणन विभाग याच इमारतीत एकत्रित करण्याचेही प्रस्तावित आहे. त्यावर मंत्रालयस्तरावरून शिक्कामोर्तब अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा

Back to top button