विद्यार्थ्यांना दिलासा ! विद्यापीठ ग्रंथालयातील तात्पुरत्या सदस्यत्व सेवेचा होणार विस्तार | पुढारी

विद्यार्थ्यांना दिलासा ! विद्यापीठ ग्रंथालयातील तात्पुरत्या सदस्यत्व सेवेचा होणार विस्तार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ज्ञानस्रोत केंद्रात संशोधक व बाहेरील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या तात्पुरत्या सदस्यत्वाच्या सेवेमध्ये विस्तार होणार आहे. या सेवेचा कालावधी एक दिवस ते एक वर्षापर्यंत वाढवण्यात यावा, अशी शिफारस जयकर ज्ञानस्रोत समितीने कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केली होती. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून लवकरच हा कालावधी वाढवण्यात येणार आहे. सध्या हा कालावधी 1 ते 8 दिवसांपर्यंतच मर्यादित असून ही सुविधा सशुल्क व नियमांच्या अधीन सुरळीत सुरू आहे.

विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्रोत केंद्रात पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील अनेक संशोधक विद्यार्थी संशोधनासाठी संदर्भ शोधण्यासाठी व आवश्यक साहित्य मिळविण्यासाठी येतात. या विद्यार्थ्यांना केंद्रातर्फे सशुल्क तात्पुरते सदस्यत्व देण्यात येते. या सदस्यत्वाचा सध्याचा कालावधी हा जास्तीत जास्त 8 दिवसांचा आहे. परंतु आता वेगवेगळ्या आवश्यकतेनुसार या सदस्यत्वाचा कालावधी विस्तारीत करण्याची शिफारस केंद्रातर्फे करण्यात आली. या शिफारसीनुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार 1, 8, 15 दिवस, 1, 3, 6 महिने तसेच 1 वर्षापर्यंत हे सदस्यत्व घेता येईल. कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जयकर ज्ञानस्रोत समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून केंद्रातर्फे लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जयकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. अपर्णा राजेंद्र यांनी दिली.

कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जयकर ज्ञानस्रोत समितीच्या बैठकीत ग्रंथालयाच्या संबंधित अनेक समस्यांचा आढावा घेत चर्चा करण्यात आली. कुलगुरू यांनी अनेक सुधारणा सुचवित तात्पुरत्या सदस्यत्व सेवेचा विस्तार करण्याची मान्यता दिली असून त्याची ग्रंथालयामार्फत लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

– प्रा. डॉ. विजय खरे, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

हेही वाचा

Back to top button