अमेरिकन रिटर्न प्रियकरला पाच वर्षाची सक्तमजुरी; प्रेयसीचे अश्लील व्हिडिओ केले होते व्हायरल | पुढारी

अमेरिकन रिटर्न प्रियकरला पाच वर्षाची सक्तमजुरी; प्रेयसीचे अश्लील व्हिडिओ केले होते व्हायरल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वारंवार लग्न करण्याचे आमिष दाखवत प्रेयसीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणार्‍या अमेरिकन रिटर्न प्रियकराला न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरी आणि सहा लाख 2 हजार रूपयांचा दंड सुनावला आहे. विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी हा निकाल दिला.

संदीप पाटील असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 26 वर्षीय तरुणीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
दाखल गुन्ह्यानुसार पीडित मुलगी आणि पाटील यांची एका संकेतस्थळाद्वारे ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. पाटील हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तर मुलगी देखील एका आयटी कंपनीत कामाला होती. पाटील याने लग्नाची विचारणा केल्याने मुलीने याबाबत घरी विचारले होते. त्यांच्या लग्नास मुलीच्या कुटुंबीयांनी परवानगी दिली होती. त्यानंतर काही दिवसानंतर पाटील याने मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. दरम्यान, पीडित तरुणीचे अश्लील व्हिडिओ पाटील याने तयार केले होते. मे 2010 मध्ये पाटील हा अमेरिकेत नोकरीला गेला. त्यावेळी त्याच्या मित्राने मुलीला सांगितले की, तुझे अश्लील व्हिडिओ पाटील याने इंटरनेटवर टाकले आहेत. याबाबत मुलीने विचारणा केली असता त्याने व्हिडिओ केवळ स्वत: बेवसाईटवर टाकल्याने तिला सांगितले. त्यानंतर पाटील याने लग्नास नकार दिला. त्यामुळे मुलीने याबाबत फिर्याद दिली होती. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील लीना पाठक यांनी आठ साक्षीदार तपासताना आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. तत्कालिक पोलिस निरीक्षक दीपक सावंत यांनी या गुन्ह्याचा तपास केला.

दंडाच्या रकमेपैकी पाच लाख रुपये मुलीस द्यावे, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद आहे. न्यायालयाने पाटील याची बलात्कार आणि फसवणुपकीच्या गुन्ह्यातून मुक्तता केली आहे. अश्लील व्हिडिओ तयार करणे, ते स्वतः जवळ बाळगणे आणि प्रसारित केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे.

Back to top button