Pune Crime : सराफांना गंडविण्याची नवीन क्लुप्ती, सोन्याच्या अंगठ्या लंपास करतेय महिला | पुढारी

Pune Crime : सराफांना गंडविण्याची नवीन क्लुप्ती, सोन्याच्या अंगठ्या लंपास करतेय महिला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : Pune Crime : ज्वेलर्सच्या दुकानात गेल्यानंतर सोन्याच्या अंगठ्या दाखविण्यास सांगून दुकानदाराची नजर चुकवुन बरोबर आणलेली बनावट अंगठी खर्‍या अंगठीच्या जागी ठेऊन चोरी करून सराफांना गंडा घातला जात असल्याचा नवीन प्रकार समोर आला आहे. दोन दिवसात अशा पध्दतीने चोरी केल्याचे चार गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये महिलेकडून चोरी करण्याची नवीन क्लुप्ती वापरण्यात येत आहे.

लक्ष्मीरोडवरील शगुन चौकात गोल्ड अ‍ॅण्ड डायमंड शोरूम आहे. 20 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास सराफी दुकानात एक महिला आली. तीने सेल्समन असलेल्या महिलेला सोन्याची अंगठी दाखविण्यास सांगितली. त्यानुसार महिलेनी दुकानातील सोन्याच्या अंगठीचा ट्रे महिलेच्या समोर ठेवला. याचवेळी आरोपी महिलेनी सेल्समन महिलेची नजर चुकवुन 51 हजारांची अंगठी चोरून नेली. याबाबत एका 39 वर्षीय महिलेनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी महिलेवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-सातारा रस्त्यावरील पदमावती येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. दि. 17 नोव्हेंबर रोजी दुपारी एक महिला दुकानात शिरली. तीने दुकानदाराला सोन्याची अंगठी दाखविण्यास सांगितली. सोन्याच्या अंगठ्या असलेलाच ट्रे दुकानदाराने समोर आला. त्यावेळी महिलेनी तिच्यासोबत आणलेली सोन्या सारखी दिसणारी पिवळ्या धातुची अंगठी खर्‍या अंगठीच्या जागी ठेऊन खरी अंगठी चोरली. यावेळी दुकानात काही खरेदी न करता महिला तेथून पोबारा केला. याबाबत सुनील नारकर (55, रा. वडगाव बुद्रुक) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, दोन्ही घटनांमध्ये दुकानातील ऐवज तपासाताना हा प्रकार उजेडात आला. हडपसर पोलिस ठाण्यात अशा पध्दतीने महिलेनी अंगठ्यांची चोरी केल्याचे दोन गुन्हे घडल्यानंतर याप्रकरणी आता सहकारनगर आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अशा गंडा घालणार्‍या महिलांपासून सावध राहण्याचे अवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Back to top button