

पुणे : पुढारी वृत्तसेवा
किरकोळ वादातून तरुणाचा सुर्याने भोकसून खून केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी एकाला जन्मठेप आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने शिक्षा भोगण्याचे निकालात नमूद करण्यात आले आहे.
एकनाथ तुकाराम सुतार (२६, रा. निकटे वस्ती, पिरंगुट, ता. मुळशी जि. पुणे) असे शिक्षा सुनाविलेल्याचे नाव आहे. याबाबत निलेश चंद्रकांत कांबळे (२१, रा. लक्ष्मीनगर, पिरंगुट ता. मुळशी) याच्या खूनप्रकरणी अमोल सुभाष मानकर (२८, रा. लक्ष्मीनगर, पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहिले. ही घटना १४ डिसेंबर २०१४ रोजी पिरंगुट येथील तथागत चौकात दुपारी घडली.
दाखल गुन्ह्यानुसार, फिर्यादी अमोल मानकर व निलेश कांबळे हे पिरंगुट येथील आठवडे बाजारामध्ये भांडी विक्री करण्याचा व्यावसाय करतात. निलेश कांबळे याची व आरोपी एकनाथ सुतार याची घटनेच्या एक दिवसापूर्वी बाचाबाची झाली होती. त्यावेळी सुतार याने निलेशला बघून घेईल अशी धमकी दिली होती. घटनेच्या दिवशी निलेश, फिर्यादी अमोल मानकर आणि निलेशचे चुलते बंडू कांबळे यांनी आठवडे बाजारात त्यांचे दुकान लावले होते. दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास सुतार हा निलेश जवळ गेला. त्याने त्याच्या जवळील सुरा निलेशच्या छातीत खुपसला तसेच त्याच्या मानेवर आणि खांद्यावर वार करून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर निलेशला तात्काळ रूग्णालयात हलविण्यात आले.
मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. यानंतर पौड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील सुनिल मोरे यांनी सात साक्षीदार तपासताना आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली. यामध्ये आरोपीच्या कपड्यावर मिळून आलेले निलेशच्या रक्ताचे डाग, सुर्यावरील रक्ताचे डाग, दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी आणि पंचाची साक्ष महत्वाची ठरली.