पक्ष चिन्हाचा घोळ : बारामती लोकसभेत अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह; खा. सुळेंचा आक्षेप | पुढारी

पक्ष चिन्हाचा घोळ : बारामती लोकसभेत अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह; खा. सुळेंचा आक्षेप

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज माघारी घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. अर्ज माघारीनंतर चिन्ह वाटप झाले. या चिन्ह वाटपामध्ये महा विकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या वतीने लक्ष्मीकांत खाबिया यांनी एका अपक्ष उमेदवाराला दिलेल्या तुतारी (ट्रम्पेट) चिन्हावर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे आक्षेप नोंदविला आहे. अर्ज माघारीनंतर रिंगणात उरलेल्या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षाचे अधिकृत चिन्ह देण्यात आले.

अपक्ष उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार चिन्हांचे वाटपही करण्यात आले. त्यात सोयल शहा शेख यांना तुतारी हे चिन्ह मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस असून, शेख यांना तुतारी (ट्रम्पेटी) चिन्ह मिळाल्याने यावरून मतदारांचा गोंधळ उडू शकतो, यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप नोंदविला आहे. मराठी नावातील ’तुतारी’ हा शब्द बदलून त्याऐवजी दुसरा शब्द निवडणूक आयोगाकडून देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

चिन्हांबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. जिल्हा निवडणूक यंत्रणा त्यांनी दिलेल्या चिन्हांचे वाटप करीत असते. याबाबत आयोगच निर्णय घेऊ शकतो.

– डॉ. सुहास दिवसे, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी

हेही वाचा

Back to top button