वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल; सिंहगडावर पर्यटकांची संख्या रोडावली | पुढारी

वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल; सिंहगडावर पर्यटकांची संख्या रोडावली

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरण चौपाटीवरील बेशिस्त खाद्यपदार्थ विक्रेते व रस्त्यावरच वाहने उभी करून मौजमजा करणार्‍या उन्मत्त पर्यटकांमुळे रविवारी पुणे-पानशेत रस्त्यावरील वाहतुकीचा फज्जा उडाला. वाहतूक कोंडीचा फटका लष्कराच्या अधिकार्‍यांसह नागरिकांना बसला. सायंकाळी उशिरापर्यंत धरण चौपाटीच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या दूर अंतरावर रांगा लागल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवेली पोलिसांनी खडकवासला धरण चौकात नाकाबंदी सुरू केली आहे. तेथे पोलिस तैनात आहेत.

धरणतीरावरील मुख्य पानशेत रस्त्यावरच थाटलेल्या चौपाटीवर पर्यटकांनी गर्दी केल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. खडकवासला जलसंपदा विभागाचे सुरक्षारक्षक वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी धावपळ करीत होते. मात्र, बेशिस्त पर्यटक आणि विक्रेत्यांमुळे तेही हतबल झाल्याचे चित्र दिसून आले.

दिवसभर पावसाळी वातावरण होते.  शनिवारी (दि. 20) पडलेल्या जोरदार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. सिंहगड घाट रस्त्यावर जोरदार वादळी पावसामुळे झाडाच्या फांद्या कोसळल्या होत्या तसेच ठिकठिकाणी मुरूम-माती वाहून आली होती. वन विभागाने फांद्या, मलबा काढून घाट रस्त्याची सफाई केली. पानशेत, वरसगाव धरण परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. सिंहगडावर मात्र पर्यटकांची संख्या रोडावली आहे. दिवसभरात पर्यटकांची 321 चारचाकी व 564 दुचाकी वाहनांची नोंद झाली. राजगड, तोरणा किल्ल्यावरही पर्यटकांची संख्या रोडावल्याचे चित्र दिसून आले.

हेही वाचा

Back to top button