पुणे/ येरवडा : पुढारी वृत्तसेवा : येरवड्यातील गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेलचालकाचा रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. विकी राजू चंडालिया (वय 28, रा. जय जवाननगर, येरवडा) याचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास विकी याच्यावर सराईत गुन्हेगार आकाश चंडालिया व त्याच्या साथीदारांनी खंडणी न दिल्यामुळे गोळीबार केला होता. यामध्ये विकी गंभीर जखमी झाला होता. सुरुवातीला त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर प्रकृती अधिक खालावल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या ठिकाणीदेखील आणखी एक शस्त्रक्रिया त्याच्यावर करण्यात आली. दरम्यान, रविवारी पहाटे चारच्या सुमारास उपचार सुरू असताना विकी याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेत येरवडा पोलिसांनी पूर्वीच पाच आरोपींना अटक केलेली आहे. मुख्य आरोपी आकाश हादेखील जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गुन्ह्यातील एक आरोपी फरार असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
विकी याच्या पश्चात आई-वडील व लहान बहीण, भाऊ असा परिवार आहे. विकी याच्या मृत्यूनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ससून रुग्णालयात, तसेच त्याच्या घराजवळ बंदोबस्त नेमला आहे. पुढील तपास येरवडा पोलिस करीत आहेत.
विकी चंडालिया आणि आकाश चंडालिया हे लहानपासूनचे मित्र होते. आकाश चंडालिया याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यात तो बरीच वर्षे कारागृहात होता. सहा महिन्यांपूर्वी तो कारागृहातून जामिनावर सुटला होता, तर विकी हा हॉटेलचे काम पाहत होता. दि. 10 एप्रिल रोजी आकाश हा विकीच्या हॉटेलवर आला. त्याने विकीला हॉटेल चालवायचे असेल, तर तुला पैसे द्यावे लागतील म्हणत खंडणीची मागणी केली. त्या वेळी विकीने पैसे देण्यास मनाई केली व सर्व प्रकार मस्करीत घेतला.
हा सर्व प्रकार विकीने त्याच्या घरी सांगितला. आकाश त्याचा लहानपणीचा मित्र असल्याने आपापसात वाद मिटतील म्हणून त्याने आकाशविरोधात खंडणीची तक्रार दिली नाही. त्यानंतर आकाशने त्याच्या साथीदारांच्या मदतीने विकीवर गोळ्या झाडल्या. रविवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जर विकीने त्याच दिवशी तक्रार दिली असती, तर आज विकी वाचला असता, असे बोलले जात आहे.
हेही वाचा